प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्हा रुग्णालया अंतर्गत लोखंडी सावरगांव येथील रुग्णालयात गट “क” आणि “ड” संवर्गाच्या पदाच्या भरतीत एकट्या जवळ्याचे २० उमेदवार कसे काय भरती केले गेले. असा प्रश्न निर्माण झाला असून, ही भरती तात्काळ रद्द करण्याची मागणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी केली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा रुग्णालयाच्या लोखंडी सावरगांव येथील रुग्णालयात नाशिक येथील एका एजन्सी मार्फत गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील उमेदवाराची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी तीन लाख रुपयांचा रेट जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याने काढल्याची व त्या पध्दतीने सत्तर ते बहात्तर उमेदवारांकडून हे पैसे गोळा केल्याची चर्चा सर्व माध्यमात आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यात ऐकायला मिळत आहे. मात्र, या भरती प्रक्रियेत अकरा तालुके असलेल्या बीड जिल्ह्यातील फक्त बीडच्या एकट्या जवळ्यातील वीस उमेदवार कसे काय पात्र झाले ? नाशिकच्या एजन्सीला इतक्या मोठ्या प्रमाणावर पात्र उमेदवार एकट्या जवळा गावातच कसे काय सापडले, हे मोठे गोडबंगाल आहे. आणि त्यामुळेच ही भरती प्रक्रिया सदोश आहे, ती रद्द झाली पाहीजे. ही भरती प्रक्रिया रद्द करण्यासाठी सर्व संबंधीत प्रशासकीय व मंत्रालयीन यंत्रणेला रितसर मागणी करणार असून, तरीही ही भरती प्रक्रिया रद्द न झाल्यास आपण या विरोधात या भरती मधील अपात्र उमेदवारांना घेऊन कोर्टात जाणार असल्याचे मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी म्हटले आहे.