बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे लवकरच पदभार!
अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ
राज्याला मिळाले दोन उपमुख्यमंत्री
अजितदादांना 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा
शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : दिवसेंदिवस देशातील राजकारण अस्थिर बनत चालले असून विश्वासार्हता कमी होवू लागली आहे. शिवसेनेपाठोपाठ आज राष्ट्रवादीचा मोठा गट फुटल्यामुळे राज्यात राजकीय भूकंप घडला. अजितदादांना 30 ते 40 आमदारांचा पाठींबा असणारा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला असून आज राजभवन याठिकाणी शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच छगन भुजबळ, प्रफुल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा पदभार धनंजय मुंडे यांच्याकडे येणार आहे. या राजकीय भूकंपामुळे मात्र राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात राजकीय भूकंपाला वर्ष होत नाही तोच दुसरा राजकीय भूकंप आज घडला. राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. आज सकाळी मुंबई येथील देवगिरी येथे झालेल्या बैठकीनंतर राज्यातील राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रेस घेत सावरासावरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुसरीकडे अजित पवार यांना पाठींबा देणारे आमदार व अजित पवार तोपर्यंत राजभवनात दाखल झाले होते. दुपारपर्यंत राजभवनामध्ये वेगवान हलचाली सुरू होत्या, याठिकाणी स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह भाजपाचे मंत्री, शिंदे गटाचे मंत्री उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्यासाठी काही तासांतच राजभवन सजवण्यात आले. याची कोणालाही कानोकान खबर नव्हती. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचा मोठा गट उपस्थित होता. यामध्ये राष्ट्रवादीचे विरोधीपक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यासह इतर आमदारांचा समावेश होता. या राजकीय भूकंपामुळे मात्र सुट्टीच्या दिवशी सर्वत्र खळबळ उडाली. काही तासामध्येच राजभवन शपथविधीसाठी तयार झाले मात्र याची कोणालाच कशी खबर लागली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या शपथविधी सोहळ्याला आमचा पाठिंबा नसल्याचे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. आजच्या या घटनेनंतर राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही हे निश्चित झाले.
तर धनंजय मुंडे ठरले किंगमेकर
राज्याच्या राजकारणामध्ये बीड जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. यामध्ये स्व.केशरकाकू, स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.विनायक मेटे यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, राष्ट्रवादीचे आ.धनंजय मुंडे यासह इतर नेत्यांची नेहमीच चलती राहिली आहे. आजच्या या बंडामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे नेहमीच राज्याच्या राजकारणात आक्रमक असल्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आजच्या राजकीय मोठ्या घडामोडीत सुद्धा बीड जिल्ह्याचे धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा आहे.
धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री म्हणून सुत्रे हाती घेणार
आघाडी सरकारमधून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर कोणीच विचार केला नसेल असे सत्तांतर राज्यात घडले. त्याला वर्ष पूर्ण होत नाही तोच आज राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. आज झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रवादीचे 9 आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर बीडचे पालकमंत्री पद धनंजय मुंडेकडे येणार हे माञ नक्की.