रणवीर अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणार विविध स्पर्धा
गेवराई प्रतिनिधी: जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य क्रीडा महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि ॲथलॅटिक स्पर्धांचा या मध्ये समावेश आहे . दि. ४ ते ११ डिसेंबर दरम्यान जयभवानी विद्यालय, गढी, शिवशारदा पब्लीक स्कुल शिवाजीनगर, शारदा विद्या मंदिर, गेवराई आणि मध्यामिक विद्यालय, दैठण येथे या स्पर्धा होणार आहेत अशी माहिती शारदा क्रीडा अकॅडमीचे संचालक रणवीर पंडित यांनी दिली.
जयभवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळा अंतर्गत होणा-या या भव्य क्रीडा महोत्सव २०२२ ची माहिती देताना रणवीर पंडित म्हणाले की, गेवराई तालुका हा खेळाडुंचा तालुका आहे. क्रिडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जयभवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या सर्व शाळेतील विद्यार्थी या क्रिडा महोत्सवात विविध गटामध्ये कबड्डी, खो-खो, व्हालीबॉल आणि ॲथलॅटिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
रविवार दिनांक ४ डिसेंबर रोजी शिवाजीनगर, गढी येथील जय भवानी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. दिनांक ४ डिसेंबर रोजी मुलींच्या गटात तर दिनांक ५ डिसेंबर रोजी मुलांच्या गटात खो-खो स्पर्धा रंगणार आहेत. दिनांक ६ डिसेंबर रोजी माध्यमिक विद्यालय, दैठण येथे मुली आणि मुले गटात व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. दिनांक ७ डिसेंबर रोजी शारदा विद्या मंदिर, गेवराई येथे मुलींच्या गटात तर ८ डिसेंबर रोजी मुलांच्या गटात कबड्डी स्पर्धा होणार आहेत. दिनांक ९ डिसेंबर रोजी शिवशारदा पब्लीक स्कुल शिवाजीनगर येथे मुलींच्या तर १० डिसेंबर रोजी मुलांच्या ॲथलेटिक्स स्पर्धा रंगणार आहेत. दिनांक ११ डिसेंबर रोजी शिवशारदा पब्लीक स्कूल येथे अंतीम सामना होऊन या क्रिडा महोत्सवाचा समारोप होणार आहे.
दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत या स्पर्धा होणार आहेत अशी माहिती रणवीर पंडित यांनी दिली. क्रिडा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून क्रिडारसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही रणविर पंडित यांनी शेवटी केले आहे. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक परिश्रम घेत आहेत.