प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यातील शहराच्या ठिकाणी कोटी रुपये खर्च करुन अनेकांनी मंगल कार्यालय उभारली आहेत. बदल्यात काळानुसार ही बाब चांगली सुद्धा आहे. परंतू मंगल कार्यालय उभारताना नियमानुसार पार्किंगची सोय करणे हे मंगल कार्यालयाची जबाबदारी आहे. परंतू अनेकांनी पार्कींगसाठी जागाच न ठेवल्यामुळे लग्न कार्यासाठी येणारे वाहने रस्त्यावर लागत आहेत. यामुळे जिल्ह्यातील बहुतांषी भागात लग्नसराईत अनेक प्रमुख रस्ते वाहतुक कोंडीने त्रस्त झाले आहेत. यामध्ये शहरातील बार्शी रोड परिसरातील जय महाराष्ट्र हॉटेल ते बार्शी नाका परिसरात असणाऱ्या मंगल कार्यालयामुळे प्रचंड वाहतुक कोंडी होते तर नगर रोड परिसरातील पोलीस पेट्रोलपंप ते चऱ्हाटा फाटा परिसरात सुद्धा हिच परिस्थिती आहे. तसेच बीड जिल्ह्यातील बहुतांषी भागात याच समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पैसे कमावणारे मंगलकार्यालय चालकांना मात्र याचे देणे-घेणे नाही, नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीची दखल घेत प्रशासनाने तात्काळ नियमबाह्य उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
बदलत्या काळात नागरिकांच्या सोयीसाठी अनेक बदल होत आलेले आहेत. यात शुभकार्यासाठी प्रत्येकजण आता मंगल कार्यालयाकडे धाव घेत आहे. तसे पाहिले तर मंगल कार्यालय हे नागरिकांच्या सोयीसाठीच आहे. धावपळीच्या जीवनात अल्पावधीमध्ये मंगल कार्यालयात शुभकार्याचे सर्वच नियोजन होते, हे नागरिकांच्या सोयीचे जरी ठरत असले तरी काही मंगलकार्यालय चालकांच्या चुकांमुळे याचा कितीतरी पटीने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक लॉन्सचालकांनी लॉन्सची उभारणी करताना येणाऱ्या वाहनांसाठी पार्कींगची सोयच केली नाही यामुळ शुभकार्यासाठी येणारे नातेवाईक, मित्रपरिवार मंगल कार्यालय परिसरातील आवारातच वाहने पार्कींग करताना दिसत आहेत. ही वाहने मुख्य रस्ता परिसरात लावल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा प्रचंड त्रास होत असून तासन्तास वाहतुक कोंडीमध्ये अडकून पडावे लागत आहेत. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात निर्माण झालेली असताना याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. तरी याकडे आता प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देवून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंगलकार्यालयांवर गुन्हे नोंद करून नेहमीच होणाऱ्या वाहतुक कोंडीपासून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.
शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर काढण्यात येणाऱ्या मिरवणूका अनेकांची डोकेदुखी बनत आहे. डीजेचा थयथयाट करत, दारूच्या नशेत झिंगाट झालेला मित्रपरिवार तासन्तास या रस्त्यावरच असतो. या मिरवणूकीमुळे मात्र येणाऱ्या- जाणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शुभकार्य करा पण ते शुभकार्य करत असताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याचा विचारसुद्धा करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे परंतु तसे होताना दिसत नाही. यामुळे बीड जिल्ह्यातील बहुतांषी भागात मिरवणूकांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या मिरवणूका मुख्य रस्त्यावर काढण्याची परवानगी देण्यात येवू नये अशी सुद्धा मागणी होत आहे.
जिल्ह्यातील अनेक परिसरात पार्कींगची सोय नसल्यामुळे वाहतुक कोंडी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस उपअधीक्षक यांना सूचना केल्या असून सर्व मंगलकार्यालय चालकांची बैठक घेवून त्यांना योग्य त्या सूचना करून लवकरच नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल
– नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक, बीड