–120b,420 चा गुन्हा नोंद असलेला एजंट सय्यद शाकेर मोकाटच
–वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल यांच्या संपुर्ण कामाची चौकशी करा, करोडाचा मोटार वाहन कर बुडविल्याचा अंदाज
–वाहन धारकांनो ही खबरदारी घ्याच; गुन्हे नोंद असलेल्या एजंटांकडून काम करुन घेणे टाळाच.
–एजंटच्या गैरकामामुळे भविष्यात जर काही गैरप्रकार समोर आले तर यापुढे संबंधित वाहनधारकांवर सुद्धा गुन्हे नोंद होणार.
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात येथील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन येथील एजंट गैरकामे करत आहेत. एका जेसीबीचे बनावट कागदपत्र बनविण्यासाठी चक्क जुन्या आरटीओंच्या सह्याकरुन बनावट कागदपत्र तयार केल्याचा प्रताप गेल्या तीन महिन्यापुर्वी येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल व एजंट सय्यद शाकेर यांनी केला होता. या प्रकरणी दोघांवर सुद्धा फसवणूकीचा गुन्हा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाला होता. तब्बल तीन महिन्यानंतर सुरेखा डेडवाल यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी (ता. 04) परिवहन आयुक्तांनी काढले. निलंबित सुरेखा डेडवाल यांच्या संपुर्ण संपत्तीची चौकशी करुन त्यांना नौकरीतुन बडतर्फ करण्याची गरज आहे. त्यांचे औरंगाबाद येथे कार्यरत असताना मोठ्या प्रमाणावर शासकीय महसूल लंपास केल्याच्या तक्रारी आहेत. बीड आरटीओ कार्यालयातील दलाल सय्यद शाकेर यांच्यावर सुद्धा 420 गुन्हा नोंद असून ते खुलेआम आरटीओ कार्यालयात फिरत आहेत. त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे. सय्यद शाकेर यांनी येथील काही अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरुन मोठ्या प्रमाणात गैरकामे करुन शासनाचा वाहन कर बुडवला आहे. सय्यद शाकेर यांनी अनेक गैरकामे करुन मोठी संपत्ती कमवली असून ती संपत्ती नातेवाईकांच्या नावे केली आहे. यामुळे सय्यद शाकेर यांच्या पुर्ण संपत्तीची चौकशी करुन त्यांनी केलेल्या गैरकामांची विशेष चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे. येथील काही अधिकारी कर्मचारी यांना हाताशी धरुन येथील एजंट शासनाचा मोठा महसूल बुडवत आहेत. परंतू याकडे आज पर्यंत कोणीच विशेष लक्ष दिलेले नाही. यामुळे येथील काही एजंट बोगस कामे करून व वाहनचालकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात मालामाल झालेले आहेत. मागच्या तीन महिन्यापुर्वी येथील एक प्रकरण उघडे झाले होते. यात येथील वरिष्ठ लिपीक सुरेखा डेडवाल व एजंट सय्यद शाकेर यांनी एका वाहनांचे बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी चक्क जुन्या आटीओंच्या सह्या केल्या होत्या. या प्रकरणी दोघांवर सुद्धा बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. हे एकच प्रकरण उघड झालेले आहे, असे अनेक प्रकरणे याठिकाणी झालेली आहेत. त्याचे बरेच पुरावे दैनिक प्रारंभ च्या हाती लागलेले आहेत. सय्यद शाकेर हे गेल्या अनेक वर्षापासून बीड आरटीओ कार्यालयात दलाल म्हणून काम करत आहेत. आज त्यांच्या हाताखाली 25 ते 30 मुले एजंट म्हणून काम पाहतात. एजंट म्हणून काम करणे चुकीचे नाही पण एजंट म्हणून काम करत असताना ती कामे नियमांने होणे गरजेचे आहे. परंतू सय्यद शाकेर हे येथील काही अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अनेक गैरकामे करतात व एखादे प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात आले की स्वताकडे कामाला असलेल्या मुलांच्या अंगावर ढकलतात व गोरगरीब कामाला असलेल्या मुलांना गुन्ह्यात अडकवतात. सय्यद शाकेर व येथील काही भ्रष्ट कर्मचारी यांना मात्र मोठा पैसा या कामातुन मिळतो. असे प्रकार गेल्या काही वर्षापासून बीड आरटीओ कार्यालयात सुरु असल्याचे वारंवार होणाऱ्या कारवायातुन दिसत आहे. येथील आरटीओ कार्यालय दलाल मुक्त करण्याची गरज आहे.
वाहनधारकांनी अशी घ्यावी काळजी
वाहनधारकांना वेळेच्या व तांत्रिक ज्ञानाच्या अभावी अनेक वाहनधारक हे आरटीओ कार्यालयात आल्यानंतर एजंटकडे कामे देतात. येथील अनेक एजंट नियमानुसार कामे करताना दिसतात परंतू काही मोजकेच एजंट असे आहेत की ते नियमाबाह्य बोगस कामे करत आहेत. जर भविष्यात एजंटनी केलेली गैरकामे उघड झाली तर विनाकारण यात वाहनधारकांना सुद्धा त्रास सहन करावा लागेल. यामुळे आरटीओ कार्यालयात गेल्या नंतर वाहनधारकांनी एजंटची खात्री करुन त्यांच्याकडे कामे द्यावेत, कामे दिल्यानंतर सुद्धा योग्य ती खबदारी घेण्याची वाहनधारकांना गरज आहे.
वाहन मालकांनी एजंट यास टॅक्स भरण्यासाठी मोठी रक्कम दिल्यास ती रक्कम कार्यालयात ऑनलाईन भरली गेली आहे किंवा नाही याची खातरजमा करावी.