खा. प्रितमताईंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने भेट…!
बीड प्रतिनिधी परतीच्या पावसाने गेली पंधरा दिवसापासून संपूर्ण जिल्हाभरात पाऊसाने थैमान मांडले आहे. शिरूर का., आष्टी, पाटोदा तालुक्यात झालेल्या ढगफुटीने तर कहरच केला. शेत पिकासह मनुष्यहानी पण झाली. ऑगस्ट महिन्यातील खंडित पावसामुळे खरीप पिके ताणली गेली. आणि सध्याच्या अतिवृष्टीमुळे पिकांना शेतात तरंगी लागली आहे. पावसाच्या कहरामुळे शेतकरी हवालदिन झाला असून, अतिवृष्टीचा फटका सहन करण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांच्या नशिबी आली. उस, सोयाबीन, कापूस, उडीद, बाजरी आदि नगदी पैशाची पिके ऐन काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातची गेले आहेत. फळबागांना मोठा फटका बसला असून, उत्पन्नात घट होणार आहे. शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन, आज बीडच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी सकाळ पासूनच आष्टी, शिरूर का., पाटोदा तालुक्याचा दौरा करून, थेट बांधावर जाऊन, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
निसर्गाच्या अवकृपेत सापडलेला शेतकरी हतबल असून, अनेक शेतकऱ्यांना खा. ताई समोर कैफियत मांडताना उर भरून आला. ताई आता तुम्ही काहीतरी करा असा टाहो फोडत महिला ताईंच्या गळ्यात पडून आपल्या वेदना आणि भावना व्यक्त केल्या. सर्वत्र भयाण परिस्थिती असून, शेती व शेतपिकांचे झालेले नुकसान तर कर्ज आणि उसनवारी करून केलेली लागवड, शेतात उपसलेले काबाड कष्ट लक्षात घेता पिकांचे झालेले नुकसान या सर्व बाबींचा विचार करता आज शेतकरी बांधव हताश व निराश होऊन शून्यात विचार करतो आहे. या दारूण परिस्थितीमुळे शेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचा विचार येऊ शकतो. गेली आठ दिवसात जिल्ह्यात शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्याची नोंद आहे.
या बिकट परस्थितीचा विचार करून, आज खा. प्रितमताई यांनी तातडीने जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची जिल्हा कचेरीच्या दारातच भेट घेऊन, अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा सांगितला. परिस्थिती गंभीर असून, पंचनाम्यासाठी कागदी घोडे नाचवण्यात वेळ न दवडता विना पंचनामा सरसकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी त्यांच्या समवेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, सर्जेराव तात्या तांदळे , किरण आबा बांगर, नवनाथ शिराळे, शांतीनाथ डोरले, बालाजी पवार, कृष्णा तिडके, कपिल सौदा, संभाजी सुर्वे, संतोष राख, बद्रीनाथ जटाल, महेश सावंत, अभिजित तांदळे सर, सुरेश माने आदी उपस्थित होते.