एकल वापर प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करावी
– जिल्हाधिकारी राधबिनोद शर्मा
बीड: – एकल वापर प्लास्टीकवर दि. 01 जुलै 2022 पासून पूर्णतः बंदी असून, यासंदर्भात जिल्ह्यामध्ये दि. 01 जुलै 2022 रोजी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून एकल वापर प्लास्टीक जप्तीची कार्यवाही करावी. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्ह्यामध्ये प्लास्टीक कारखान्यांवर कायद्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिल्या.
केंद्र शासनाच्या दि. 12 ऑगस्ट 2021 च्या अध्यादेशानुसार एकल वापर प्लास्टीकवर दि. 01 जुलै 2022 पासून पूर्णत: बंदी घालण्याचे आदेश असून, याबाबत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन जनजागृती करावी. सर्व नगरपरिषदांनी त्यांच्या कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावावेत, असेही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी यावेळी सूचित केले.
केंद्र शासनाच्या दि. 12 ऑगस्ट 2021 च्या अध्यादेशानुसार एकल वापर प्लास्टीकवर दि. 01 जुलै 2022 पासून पूर्णत: बंदी घालण्याचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने दि. 26 एप्रिल 2022 च्या आदेशान्वये जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठीत करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार बीड जिल्हा टास्क फोर्सची पहिली बैठक जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जालना यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी कायद्यात नमूद केल्यानुसार दि. 01 जुलै 2022 पासून जिल्ह्यामध्ये प्लास्टिक बंदीबाबत विविध स्तरावर कार्यवाही करण्याबाबत कळविले. तसेच याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.