परिवहन मंञी व संबंधित अधिकार्यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड आगारातील कर्मचारी यांची पगार महिन्याच्या ७ तारखेला होत असते परंतु गेल्या काही महिन्यापासून पगार वेळेवर होत नसल्यामुळे येथील अनेक कर्मचार्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यातील एका वाहन चालकाने आज राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
बीड आगारातील वाहन चालक तुकाराम त्रिंबक सानप
(रा. अंकुश नगर बीड. वय ३६) यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती नातेवाईकांनी व बस स्थानकातील कर्मचार्यांनी दिली. सोमवारी (ता. ११) त्यांनी दिवसभर नियोजनानुसार बसच्या फेर्या केल्या होत्या. घरी गेल्यानंतर त्यांनी अंकुश नगर येथील राहत्या घरी गळफास घेऊ आत्महत्या केली. नियमानुसार बस कर्मचार्यांचा पगार ७ तारखे पर्यंत होत असतो परंतु या महिन्यात अजून सुद्धा पगार झालेला नाही. यामुळे सध्या बस स्थानकातील कर्मचार्यांना विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आली. मयत तुकाराम सानप यांच्या घरची लाईट गेल्या १५ दिवसापुर्वी कट केली होती. यासह घरातील किराणा संपला होता, यासह इतर कारणांमुळे तुकाराम सानप यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईक, मिञ, बस स्थानकातील कर्मचार्यांनी दिली. मयत सानप यांना एक चार वर्षाचा व एक ६ वर्षाचा असे दोन मुले आहेत. काम करुन सुद्धा कर्मचार्यांना वेळेवर पैसे मिळत नसतील तर संबंधित मंञी व अधिकार्यांवर गुन्हे नोंद करा अशी मागणी बस कर्मचारी करत आहेत.