महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय बीड व युवा ग्राम विकास मंडळ केज यांचा संयुक्त उपक्रम
बीड :- युवा ग्राम विकास मंडळ आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘बाल विवाह प्रतिबंध शपथ’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बाल विवाहातून वाचलेल्या मुलींसाठी सुरू होत असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाला एक वर्ष पूर्ण होत असताना तसेच राज्यस्तरावर १५ ऑक्टोबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या बाल विवाह मुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प या १०० दिवसीय अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे, सदस्य संतोष वारे, एस. पी. राजहंस व छाया गडगे, lपोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, ओमप्रकाश गिरी, तत्वाशील कांबळे, शक्तीसदनचे उमेश होमकर, आशा धनवडे, उषा जाधव, सखी वन स्टॉप सेंटरच्या शांता खांडेकर, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रविण वीर व स्वप्नील कोकाटे तसेच युवा ग्राम विकास मंडळाचे एच. पी. देशमुख, संतोष रेपे, प्रकाश काळे यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या अलायन्सच्या मार्गदर्शनाखाली युवा ग्राम विकास मंडळाने केलेल्या कामाचा आढावा एच. पी. देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर केला. बाल कल्याण समितीकडे येणाऱ्या बाल विवाह प्रकरणांबाबत अशोक तांगडे आणि संतोष वारे यांनी माहिती देत येणाऱ्या अडचणी मांडल्या. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ जिल्ह्यात कशाप्रकारे कार्यरत आहे आणि l विवाह प्रकरणांमध्ये एफ.आय.आर. नोंदविण्यात आले असल्याची माहिती मंगेश जाधव यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी बालकांच्या सुरक्षेसाठी तत्पर मदत करण्याचे आश्वासन दिले.
अभियानाची कामगिरी तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आली असून पहिल्या टप्प्यात शाळा–महाविद्यालयांमध्ये जनजागृती, दुसऱ्या टप्प्यात धार्मिक स्थळे व विवाहसेवा देणाऱ्या व्यक्तींमध्ये जागरूकता, तर तिसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत आणि शहरी समुदाय पातळीवर सहभाग यावर भर देण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी बाल विवाह प्रतिबंध शपथ घेतली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला व बाल विकास विभागातील मंगेश जाधव, स्नेहा मस्के, तसेच युवा ग्राम विकास मंडळाचे संतोष रेपे, प्रकाश काळे, सुनिता विभूते, मनीषा स्वामी, अस्मिता इंगळे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

















