परळी वैजनाथ – परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून जनसंपर्काला वेग आला असून, त्याअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) समर्थित उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख यांच्या गाठीभेटी अभियानाला आज बरकत नगर परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. शहरातील मुस्लिम बहुल आणि सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या भागात झालेल्या दौऱ्यात मतदारांचा उत्साह लक्षणीय होता.
निवडणूक अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर श्री. दीपक रंगनाथ देशमुख हे स्वतः पत्नी सौ. संध्या देशमुख यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले असून, मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. बरकत नगर भागातील प्रचारदौऱ्यात ते जेव्हा मतदारांमध्ये पोहोचले, तेव्हा नागरिकांनी त्यांचे मनापासून स्वागत केले.
यावेळी संवाद साधताना श्री. देशमुख म्हणाले, “बरकत नगरचा सर्वांगीण विकास हा आमचा प्राधान्यक्रम आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मतदारांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आमच्यासाठी मोठा विश्वासाचा धागा आहे.”
या गाठीभेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे परळीतील प्रमुख नेते उत्तम माने, ज्येष्ठ कार्यकर्ते जीवनराव देशमुख, सय्यद फिरोज तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक नागरिक, तरुण, महिला यांनी गाठीभेटीत उत्साहाने सहभाग नोंदवत सौ. संध्या देशमुख यांना भक्कम पाठिंबा दर्शविला.
बरकत नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनीही या वेळी आपल्या समस्या आणि अपेक्षा मांडल्या. त्यावर तात्काळ प्रतिसाद देत श्री. देशमुख यांनी समस्यांचे निराकरण प्राधान्याने करण्याचे आश्वासन दिले. प्रचारादरम्यान अनेकांनी सौ. संध्या देशमुख यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक करत “या निवडणुकीत त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा निर्धार व्यक्त केला.
या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परळी नगरपरिषद निवडणुकीच्या राजकीय वातावरणात उत्सुकता वाढली असून, सौ. संध्या दीपक देशमुख यांच्या उमेदवारीला बरकत नगरकडून भक्कम आधार मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

















