Beed : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस सर्वसामान्य नागरिक, शांतता समिती सदस्य आणि निवडणूक उमेदवार उपस्थित होते. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेवून निवडणूक काळातील अडचणींची माहिती पोलिस प्रशासनाने सहभागी नागरिकांसोबत सामायिक केली.
बैठकीदरम्यान बीड उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
शहरात संध्याकाळच्या गस्तीची शृंखला अधिक कडक स्वरूपात राबवण्यात येईल.
निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या किंवा गोंधळ घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
निवडणूक काळात जास्तीत जास्त पोलिस बंदोबस्त आणि मनुष्यबळ तैनात केले जाईल.
नागरिकांनी संयम पाळून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, कुणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि निवडणूक पूर्णपणे शांततेत पार पाडावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
याचबरोबर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी तक्रारी नोंदविण्यासाठी उपलब्ध केलेले QR कोड, हेल्पलाईन नंबर, विविध डिजिटल प्लॅटफॉर्म याबद्दल नागरिकांना माहिती देण्यात आली. प्राप्त तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही सांगण्यात आले.
या कालावधीत सोशल मीडियावरही कडक लक्ष ठेवण्यात येणार आहे. भडकावू पोस्ट, अफवा किंवा नियमबाह्य सामग्री प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध त्वरित गुन्हा दाखल करून अटक करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.
निवडणूक प्रक्रिया शांत, पारदर्शक आणि सुरक्षीत वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांनी केले.















