परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांत धनंजय मुंडे यांनी केली नुकसानीची पाहणी
शासनाकडे १००% नुकसान भरपाई साठी पाठपुरावा करणार – मुंडेंनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला धीर
ममदापूर येथील पुरात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना प्रशासनाची ४ लाखांची मदत सुपूर्द
परळी वैद्यनाथ – परळी वैद्यनाथ तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान व पुरपरिस्थीची माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. या दरम्यान तेलसमुख येथील एका शेतातील संपूर्ण कापसाच्या उभ्या पिकाचे पावसाने पूर्णपणे नुकसान झाले असून, संबंधित शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी महिलेला धनु भाऊंच्या समोर अश्रू अनावर झाले.
शेतकरी महीलेने हाती आलेले संपूर्ण पीक नासले, लाखांवर नुकसान झाले भाऊ, आता लेकीचे लग्न कसे लावू? असा प्रश्न उपस्थित करताच धनंजय मुंडे यांनी शासन आपली मदत करेल अक्का, पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, ठरलेल्या वेळीच लग्न होईल, त्याच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो, असा शब्द देत मोलाचा आधार दिला. रेखाबई तुकाराम कदम असे संबंधित शेतकरी महिलेचे नाव असून त्यांचे कापसाचे पूर्ण पीक पाण्याने नासून गेले आहे.
परळी वैद्यनाथ तालुक्यात गोदावरी नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वाण नदिसह लहान मोठ्या सर्वच नद्यांना आलेल्या पुराने अनेक ठिकाणी शेतीतील माती खरडून गेली आहे, काही ठिकाणी नदीतील दगड गोटे शेतात वाहून आलेत तर अजूनही पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी तेलसमुख, ममदापूर, बोरखेड आदी गावांना भेटी देऊन स्थानिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला, तसेच प्रशासनास १००% नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने योग्य पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान ममदापूर येथील ३८ वर्षीय तरुण शिवराज कदम हा पुराच्या पाण्यात दि. १६ सप्टेंबर रोजी रात्री कौडगाव हुडा येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत झाला होता, त्या तरुणाच्या कुटुंबीयांना आज प्रशासनाच्या वतीने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. सदर रक्कम मयत शिवराज कदम यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
यावेळी युवक नेते अजय मुंडे, सूर्यभान मुंडे, राजाभाऊ पौळ, प्रभाकर पौळ, संजय जाधव, नितीन निर्मळ, भागवत कदम, बालासाहेब कदम, वसंत राठोड, भगवान पौळ, जानीमिया कुरेशी, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या सह महसूल, कृषी, पोलीस आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.