नुकसानग्रस्तांशी साधला संवाद ; सॅनिटरी नॅपकिन पासून पेन किलर पर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तू पाठविण्याचे दिले आदेश
बीड जिल्हयाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न
धोंडराई, हिरापूर, शिरूर कासार, ब्रह्मनाथ येळंब, मानूरसह पाथर्डीतही केला दौरा
बीड : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्ह्यात बैलगाडीतून नुकसानीची पाहणी केली. जिल्हयात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून शासनामार्फत जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत असे त्यांनी सांगितले.
मागील आठवड्यानंतर जिल्हयात पुन्हा एकदा गेल्या दोन दिवसांपासून जोरदार अतिवृष्टी झाली. विशेषतः शिरूर कासार, बीड ग्रामीण, गेवराई, माजलगांव या तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला, अनेकांच्या घरांचे नुकसान झाले, संसार उघडय़ावर आले तर पिकांमध्ये तळे साचले, जमीन पार खरडून गेली.
ना. पंकजाताई मुंडे अतिवृष्टीचा दौरा करून कॅबिनेट बैठकीसाठी मुंबईला गेल्या आणि त्याच दिवशी जिल्हयात पुन्हा अतिवृष्टी झाली, त्यामुळे तातडीने त्या जिल्हयात दाखल झाल्या. सकाळी पालकमंत्री असलेल्या जालन्यात पाहणी केल्यानंतर दुपारी त्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे आल्या, इथे बैलगाडीतून त्यांनी नुकसानीची पाहणी केली. आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन तसेच सर्व प्रमुख अधिकारी त्यांचेसमवेत होते.
*हिरापूरमध्ये बांधावर घेतला भाजी भाकरीचा आस्वाद*
———
सिंदफणा नदीला आलेल्या पुराचे पाणी हिरापूर परिसरातील शेतात घुसल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली. ना. पंकजाताईंनी दुपारी शेताच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. पाहणी दौऱ्यानंतर एका शेतात शेतकऱ्यां समवेत बांधावरच भाजी भाकरीचा त्यांनी आस्वाद घेतला. ना. पंकजाताईंनी ब्रह्मनाथ येळंब येथे जि.प. शाळेत विस्थापित केलेल्या नुकसानग्रस्तांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सॅनेटिरी नॅपकिन पासून ते पेन किलर पर्यत सर्व जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. नांदेवली, शिरूर कासार, मानूर तसेच पाथर्डी तालुक्यातील (जि. अहिल्यानगर) मालेवाडी, मुंगूसवाडे, कीर्तनवाडी आदी ठिकाणीही नुकसानीची पाहणी केली.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा ; अधिकची मदत मिळवून देऊ
गेल्या १७ सप्टेंबर पासून मी अतिवृष्टीचा दौरा करत आहे. परळीत ममदापूर, पोहनेर मध्ये गेले, त्यानंतर पाटोदा तालुक्यात भाकरे वस्ती, वैद्यकिन्हीला पाहणी केली, कलेक्टर ऑफिसमध्ये आढावा घेतला, त्यानंतर मुंबईत जाऊन कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्री व दोन्ही उप मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा केली. जिल्हयात खूप जास्त नुकसान झाले आहे, जमीनी खरडून गेल्या आहेत, जिल्हयाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करत आहे असे ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.