*जातीवाद संपवून समाजात समतेची नवी सुरुवात व्हावी : धनंजय मुंडे*
बीडमध्ये सत्यशोधक पुरस्कारांचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण
बीड/प्रतिनिधी
“हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. मात्र अलीकडच्या काळात महापुरुषांना जातिवादाच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. ही प्रवृत्ती समाजातील बंधुभावाला धक्का देणारी आहे. जातीजातीत महापुरुष वाटून घेतले जाणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. त्यामुळे ही परिस्थिती आपण सर्वांनी मिळून नाहीशी करून समाजात पुन्हा एकदा खरी समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे शनिवार (दि.६) रोजी महाराष्ट्र आधार सेना, दैनिक महाराष्ट्र आरंभ आणि सत्यशोधक प्रतिष्ठान यांच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मुंडे पुढे म्हणाले की, “साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने होणारा हा सोहळा परिवर्तन घडवणारा आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. समाजाच्या इतरही मागण्यांसाठी आपण नेहमीच ठामपणे लढा देणार आहोत. घरकुल, गायरान यांसारख्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून आवाज उठविण्यात आपण कधीही मागे हटणार नाही.”
गेल्या १७ वर्षांपासून समाजासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचे काम दीपक थोरात यांनी केले. त्याबद्दल मुंडे म्हणाले की, “सत्यशोधक पुरस्कार हा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे. ज्यांना हा सन्मान मिळतो त्यांना नव्या उर्जेचा संचार होतो. दीपक थोरात यांनी एक शिस्तप्रिय कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून आज यशस्वी संपादक म्हणून लौकिक मिळवला आहे. त्यांच्या अथक परिश्रमांतून आणि संघर्षातून प्रेरणा घेण्यासारखे आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येऊन त्यांनी गाठलेले यश हे खऱ्या अर्थाने समाजासाठी आदर्श आहे. त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत.”
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करताना सभागृहात उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या प्रश्नांवर आणि समतेच्या मूल्यांवर भर देणारे मुंडे यांचे विचार उपस्थितांवर ठसा उमटवणारे ठरले.
*चौकट*
यावेळी स्वर्गीय एकनाथ आवाड यांनी उभा केलेला पात्र लाभार्थींच्या गायरानचा लढा मी हाती घेणार असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले. यावेळी मी माझी मातृ तुल्य गयाबाई आवाड यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला मिळाले यावेळी मी भारावून गेलो, असेही मुंडे म्हणाले.
यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील महामेरू लोकप्रभाचे संपादक संतोष मानुरकर, उत्कृष्ट उपसंपादक उत्तम हजारे, दैनिक पुण्यभूमीचे सुनील डोंगरे, प्रजापत्राचे बाबुराव झेंडे, उत्कृष्ट फोटोग्राफर कृष्णा शिंदे, ज्ञानेश्वर वायबसे सह शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य असणाऱ्या सीमा ओस्तवाल, सिने वनवा नावाचा चित्रपट अभिनेत्री श्रुती सह अभिनेता पत्रकार बाळासाहेब आडागळे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोनटक्के, उत्कृष्ट रक्तदान शिबिर बबलू शिंदे तुषार लोंढे उत्कृष्ट अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती बाबासाहेब कांबळे दिंद्रुड व रामतीर्थ येथील मसूर पवार यांनी उत्कृष्ट जयंती काढल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच महाराष्ट्र आधार सेना संस्थापक अध्यक्ष, सायं. महाराष्ट्र आरंभाचे संपादक दीपक थोरात, उद्धव आरे अशोक वाघमारे सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते