स्वातंत्र्य दिनानिमित्त जालन्यात पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
जालना : जालना शहर औद्योगिक शहर म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. यापुढेही जालना जिल्ह्यात शासनाकडून विविध विकासात्मक कामे करुन आपल्याला विकास साधावयाचा आहे. तरी पालकमंत्री या नात्याने जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द राहील, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती. तर यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्यात नूकत्याच पार पडलेल्या महसूल सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्हाभरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, वृक्ष लागवड, विविध दाखल्याचे वितरण, डिबीटीद्वारे लाभ, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे यासारखी अनेक उल्लेखनीय कामे करण्यात आली आहे. पाणंद रस्ते, शेतरस्ते मोकळे करणे अभियानातंर्गत जालना जिल्ह्यात एकुण 180 रस्ते ज्यांची लांबी 288.25 कि.मी.अतिक्रमणमुक्त करण्यात आले असून नोंद अधिकार अभिलेखात घेण्याची कार्यवाही सुरु आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणुन काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सन 2025-26 पासून तालूका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य स्तरांवर प्रोत्साहन देण्यासाठी ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान’ राबविण्यात येणार आहे.
जालना जिल्हा परिषदेने पर्यावरणपुरक आणि सामाजिक हितासाठी तसेच पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी जिल्हा परिषद परिसर स्वच्छ व सुंदर राहावा याकरीता ‘झिरो प्लास्टिक मोहिम’ राबवून प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. याचप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात देखील ही मोहिम राबविण्याचे प्रशासनाचा मानस आहे. तरी या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जालना जिल्ह्यातील समग्र शिक्षा योजने अंतर्गत वर्ष 2025-26 मध्ये 15 जुन रोजी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एकुण 1 लाख 38 हजार 21 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वितरण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीतील 57 विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविला आहे. त्यापैकी 13 विद्यार्थ्यांनी सुवर्ण तर 2 विद्यार्थ्यांनी रौप्य आणि 2 विद्यार्थ्यांनी कास्य राष्ट्रीयस्तरावरील पदके मिळवली आहेत. जिल्हा क्रिडा संकूलामध्ये अद्ययावत क्रिडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यामध्ये अंतर्गत टेनिस कोर्ट, सिंथेटीक बास्केटबॉल, आर्टिफिशियल क्रिकेट टर्फ, सिंथेटीक स्केटींग रिंग, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान, खोखो मैदान, जिम हॉल, , संरक्षक भिंत तसेच अंतर्गत रस्ते व ड्रेनेज लाईन आदि कामे जिल्हा क्रीडा संकुल समितीकडून विकसित करण्यात आली आहेत. तर 400 मिटर सिंथेटीक ट्रॅक व नॅचरल फुटबॉल मैदानाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये स्पर्धा व सराव करण्याची वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने जालना जिल्हाधिकारी यांच्या ‘महादीप’ या महत्वाकांक्षी योजनेतून श्रीहरी कोटा येथील इस्रो अंतराळ विज्ञान केंद्रातील संग्रहालयात जिल्ह्यातील 50 विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परिक्षा घेवून विमानाद्वारे सहल नेण्यात आली.
*नवीन गुंतवणुकीला चालना*
——
जिल्ह्यात नवीन गुंतवणूकीला चालना देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एप्रिल 2025 मध्ये जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत 4 उद्योगासोबत 2 हजार 79 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले असून, यामधून सुमारे 3 हजार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेने काम करावे यासाठी महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यात 357 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. तसेच पशुसंवर्धन व्यवसायाला आता कृषी समकक्षचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेमध्ये जालना जिल्ह्यातील सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
शंभर दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी 6 मे ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत दीडशे दिवसांचा कृती आराखडा जाहिर केला आहे. या उपक्रमांतर्गत ‘विकसित भारत 2047’ च्या धर्तीवर ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्र-2047 करिता व्हिजन डॉक्यूमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाची प्रचलित कार्यपध्दती अधिक लोकाभिमुख, पारदर्शी आणि सहजसुलभ होण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणात्मक बाबी असाव्यात, याकरीता जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपले अभिप्राय सादर करावेत. असे आवाहन करते.
स्व.गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेअंतर्गत अपघाताने मृत्यू झालेल्या व अपंगत्व आलेल्या एकुण 210 शेतकऱ्यांच्या वारसदारास 4.25 कोटी रुपये रक्कम सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा -2 अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये 177 गावांची निवड करण्यात आली असून ग्राम कृषि विकास समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत 531 लाभार्थ्यांना 26.64 कोटी रुपये कर्जाचे वितरण तर 11.30 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, तिरंगामय वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाषणानंतर पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते गौरवास्पद कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, तसेच विर पत्नी, विर पिता यांच्यासह 100 दिवसांच्या कार्यक्रमात अव्वल आलेल्या कार्यालयाचाही यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित लोकप्रतिनिधी, मान्यवर व नागरिकांची पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी भेट घेतली. प्रारंभी ध्वजारोहण झाल्यानंतर पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.