केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर चर्चा करण्याची केली मागणी
बीड: सोमवारी मतचोरीच्या विषयावरून इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी बीडचे खा.बजरंग सोनवणे आघाडीवर दिसले. दरम्यान, मंगळवारी सभागृहात याच विषयावर खा. बजरंग सोनवणे यांनी जोरदार आवाज उठवला. या विषयावर संसदेत आवाज उठवणारे खा.सोनवणे हे पहिले सदस्य ठरले. त्यांच्या समर्थनार्थ इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. अखेर, गोंधळ वाढल्याने लोकसभा अध्यक्षांना कामकाज बंद करून सभा तहकूब करावी लागली.
इंडिया आघाडी, ज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार, राजद, भाकप (माले), शिवसेना (उबाठा), तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांचा समावेश आहे. यांनी बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष व्यापक पुनरावलोकनाला तीव्र विरोध दर्शविला आहे. आघाडीचे म्हणणे आहे की हा उपक्रम गरीब, वंचित, अल्पसंख्याक आणि स्थलांतरित लोकसंख्येतील लाखो मतदारांना मताधिकारापासून वंचित ठेवण्याचा गंभीर धोका निर्माण करतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान निवडणूक आयोगाच्या पक्षपाती आणि लहरी कारभारामुळे, मतदान सुरू होईपर्यंत मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करण्यात आला. या कारभाराचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला झाल्याचा आरोप खा. सोनवणे यांनी केला आहे. परिणामी, निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून देशभरात असंतोषाची लाट उसळली आहे. या असंतोषाच्या विरोधात कालपासून इंडिया आघाडीच्या ३०० पेक्षा अधिक खासदारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मोर्चा काढला. या मोर्चात खा.बजरंग सोनवणे यांनी ठळकपणे सर्वांचे लक्ष वेधले. संसद सभागृहाबाहेर जोरदार निदर्शने सुरू असतानाच आज सभागृहात या विषयावर खा.बजरंग सोनवणे यांनी जोरदारपणे आवाज उठवला. या विषयावर संसदेत आवाज उठवणारे खा.सोनवणे हे पहिले सदस्य ठरले. त्यांच्या समर्थनार्थ इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी घोषणाबाजी करत गदारोळ केला. अखेर, गोंधळ वाढल्याने लोकसभा अध्यक्षांना कामकाज बंद करून सभा तहकूब करावी लागली. देशभरातील खासदारांनी खा.बजरंग सोनवणे यांच्या मागणीला पाठींबा दिला. यामुळे दिल्लीत बीडच्या खासदाराचा डंका पहायला मिळाला. आजवर अशाप्रकारे आक्रमकबाणा दिल्लीच्या सभागृहात बीडचा दिसला नव्हता. खा.सोनवणे यांनी सबंध देशाला बीडचा आक्रमक बाणा दाखवून दिला.