आ. पंडित यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न
बीड प्रतिनिधी ः- मौजे गढी येथील उड्डाण पुलावर झालेल्या अपघात प्रकरणी आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. महामार्गावरील ब्लॅकस्पॉटच्या अनुषंगाने उपाययोजना करावी, राष्ट्रीय महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, उड्डाण पुलाची कामे तात्काळ सुरु करावीत यांसह अपघात रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना करून महामार्गाच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश आ. विजयसिंह पंडित यांनी या बैठकीत दिले, तर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गांभीर्याने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. बैठकीला सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दि.२६ मे रोजी झालेल्या अपघातात सहा तरुणांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. या घटनेनंतर आ. विजयसिंह पंडित यांनी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा सुरु केला आहे. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय विधानसभेत उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या बाबत मंगळवार, २२ जुलै रोजी आ. पंडित यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आ. विजयसिंह पंडित यांच्यासह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे अभियंता आशिष देवतकर, कार्यकारी अभियंता आर.पी.तोंडे, तहसिलदार संदिप खोमणे, महामार्ग विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक लंके, वाहतुक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक जाधवर, सर्व्हेअर दिपक राऊत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
गढी उड्डाण पुलावरील अपघातानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सादर केलेल्या विश्लेषणात्मक अहवालात हा पुल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे नमुद करून अपघाताच्या ठिकाणी उपाययोजना सुचविल्या आहेत. आ. पंडित यांनी विधानसभेत या बाबत आवाज उठविल्यानंतर अपघात स्थळी कामे झाली असली तरी प्रत्यक्षात पुन्हा त्याठिकाणी पाणी साठत आहे. याप्रकरणी आ. विजयसिंह पंडित यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून उड्डाण पुलाची तांत्रिक बाजू तपासण्यासाठी महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची यानिमित्ताने सूचना केली. महामार्गावरील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ सुरु करण्याच्या सूचना करून रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्तीची कामे सुरु करण्याच्या सूचनाही आ. विजयसिंह पंडित यांनी केल्या.
कल्याण-विशाखापट्टनम् या महामार्गावरील मौजे सिरसदेवी येथील महामार्गावरील पाण्याचा कायमस्वरुपी निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यासह गढी ते माजलगाव या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून ही कामे करण्यासाठी लेखी व तोंडी आजवर पाठपुरावा केला असून ही कामे तात्काळ सुरु करण्याची सूचना आ. विजयसिंह पंडित यांनी केली. गढी ते माजलगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ५६ कोटी रुपये किंमतीच्या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित झाले असून सिरसदेवीसह इतर ठिकाणच्या रस्ता नुतणीकरणाची कामे महिनाभरात सुरु होणार असल्याची माहिती महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे यांनी दिली. गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅकस्पॉटच्या संदर्भाने तात्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना आ. विजयसिंह पंडित यांनी या बैठकीत दिल्या.
गेवराई शहराच्या दोन्ही प्रवेशिकेजवळ उड्डाण पुलाची कामे तातडीने सुरु करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात बैठकीत चर्चा होऊन ही कामे सुध्दा लवकरात लवकर सुरु होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. आजच्या बैठकीच्या निमित्ताने झालेल्या चर्चेनुसार गांभीर्याने कार्यवाही करून अपघात मुक्त महामार्ग करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.