बीड प्रतिनिधी : शहरातील नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शिष्टमंडळाने नगरपरिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याकडे गुरुवारी (दि.२२) केली. पक्षाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात माजी नगरसेवकांचा समावेश होता. विविध विभागांतील समस्यांवर ठोस कृती आराखडा राबवावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शहरातील मान्सूनपूर्व स्वच्छता, नालेसफाई, पथदिवे, रस्त्यांची दुरवस्था, पाणी पुरवठ्याची विस्कळीत व्यवस्था, अपूर्ण गाळे व बाजारपेठांची कामे, तसेच आरोग्य सुविधा आणि कर वसुलीतील अडचणी आदी मुद्द्यांवर शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. सध्या शहरातील अनेक मुख्य नाले कचऱ्यामुळे तुंबले असून, त्यामुळे डास, दुर्गंधी व आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. हे नाले तातडीने यंत्राच्या सहाय्याने साफ करण्यात यावेत. तसेच, नव्या घंटागाड्या, जेसीबी व कम्पॅक्टर खरेदी करून स्वच्छतेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंद अवस्थेत आहेत तर काही भागांत दिवसा दिवे सुरू असतात. हायमास्ट दिव्यांचीही अवस्था दयनिय असून, त्यांची त्वरित दुरुस्ती आवश्यक आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढवून मिनी हायमास्ट दिवे, स्मशानभूमीत प्रकाशयोजना व नगरपरिषद इमारतीवर सौर प्रकल्प बसविण्याचेही सुचविण्यात आले.
पाणी पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर व्हावे, माजलगाव व बिंदुसरा प्रकल्पाच्या मदतीने नव्या पाणी योजनांचा प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा, अशा सूचना शिष्टमंडळाने केल्या. श्रीरामनगर येथील जुन्या पाण्याच्या टाकीऐवजी नवीन टाकी उभारण्याची, तसेच अनधिकृत नळजोडण्या नियमित करून कराच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्यात आली.
बांधकाम विभागाच्या कामांबाबतही विविध सूचना देण्यात आल्या. यशवंत नाट्यगृह, आंबेडकर सांस्कृतिक भवन यांची दुरुस्ती करावी, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करावे, नव्या भाजी मंडई व गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करून सुरू करावे, तसेच रस्त्यांवरील खड्डे, सिमेंट रोडच्या सांधेबांध तातडीने कराव्यात. बेघर महिला निवारा गृह व नव्या स्मशानभूमीची उभारणी गरजेची असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अपुरी पडत असल्याने नव्या केंद्रांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी सूचना करताना पेठ बीड, शाहूनगर भागांसाठी आरोग्य केंद्रांची गरज अधोरेखित करण्यात आली. कर वसुलीसाठी डिजिटल पद्धतीचा वापर करून गुगल पे, गुगल पेसारखी ॲप विकसित करावी, तसेच व्यवसायिक गाळ्यांची नव्याने नोंदणी करून नगरपरिषदेला उत्पन्न वाढवण्याचा सल्ला देण्यात आला.
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार फायर ब्रिगेडची नवी वाहने, भुयारी गटार योजना व एसटीपीसाठी जागा निश्चित करणे, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण व मियावाकी पद्धतीने दाट लागवड करणे अशाही सूचनांचा समावेश निवेदनात करण्यात आला.
शहरातील नागरिकांनी वारंवार मांडलेल्या या समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी माजी नगरसेवक बाबुराव दुधाळ, गणेश वाघमारे, भीमराव वाघचौरे, नरसिंग नाईकवाडे, सादेक जमा, भास्करराव जाधव, इकबाल शेख, विकास जोगदंड, प्रेम चांदणे, सतिश पवार, राणा चौहान, मुन्ना इनामदार, रवींद्र कदम, शुभम धुत, जैतुल्ला खान, बिभीषण लांडगे, नितिन साखरे, दत्ता जाधव, नसीर अन्सारी, बाळासाहेब आंबेकर, साऊद भाई, महेश गर्जे, नागेश तांबारे, मंगेश धोंगडे, विनोद हातागळे, डॉ.रमेश शिंदे, विठ्ठल गुजर, गजानन जवकर, शुभम कातांगळे, नामदेव गायकवाड, विशाल राऊत, भीमराव दळे, दगडू म्हेत्रे, प्रकाश कानगावकर, विद्याभूषण बेदरकर, जाफर इनामदार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरपरिषदेचे सर्व विभागाचे प्रमुख, नागरिक उपस्थित होते.