पशूसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माहिती
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत परळीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा घेतला आढावा
बीड : नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना यापुढे राज्यभरासाठी एक सारखा असा टाईप प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.
उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक पार पडली, त्यावेळी ना. पंकजाताई बोलत होत्या. खरीप हंगाम पूर्व आणि जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा तसेच जिल्ह्यातील महत्वाचे प्रकल्प असलेले प्रस्तावित विमानतळ, अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्ग, कृषी महाविद्यालय परळी, बिंदुसरा स्वच्छता, जिल्हा क्रीडा संकुल, शासकीय इमारती आदी विविध विषयांचा आढावा यावेळी बैठकीत घेण्यात आला.
यावेळी बैठकीत बोलताना ना. पंकजाताई म्हणाल्या, अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाला नवीन इमारतींची गरज आहे. यापुढे नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतींचे बांधकाम करत असताना संपूर्ण राज्यभर एक सारखा असा टाईप प्लॅन तयार करून इमारती बांधल्या जातील.
बीड, जालन्यात विशेष तरतूद
——-
बीड व जालना जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय दवाखाना बांधण्याकरिता राज्य स्तरावरून निधीची विशेष तरतूद करण्यात येईल असं ना. पंकजाताई मुंडे यावेळी सांगितलं. परळी येथे होत असलेल्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित कामाचा बैठकीत आढावा घेण्यात आला.