गेवराईत १८ कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पि.टी.आर.चे वाटप
गेवराई शहराच्या हद्द वाढीसह इतर प्रश्न तात्काळ मार्गी लावणार अजित दादांचे आश्वासन
गेवराई : राज्यातील जनतेने या महायुतीला भरभरून प्रतिसाद देत महायुतीला कौल दिला. यामध्ये गेवराई विधानसभा मतदार संघातून तुम्ही विजयसिंह पंडित यांना भरघोस मताने निवडून देत खंबीर साथ दिली आसून आता मी सरकार म्हणून त्यांना विविध विकास कामासाठी भरघोस निधी देऊन बळ देण्याचे काम करणार आसल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी केले, तर आ. विजयसिंह पंडित यांनी प्रामुख्याने गेवराई शहराच्या हद्द वाढ व बायपास टू बायपास रस्त्यासाठी विशेष पाठपुरावा केलेला आसून मी जातीने लक्ष घालून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार आसल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी गेवराईकारांना दिले. गेवराई येथे विकास कामांचा शुभारंभ व अतिक्रमण धारकांना हक्काच्या पी.टी.आर.चे वाटप करताना ते बोलत होते.
माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली आ. विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून १८ कोटी रु. किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ व अतिक्रमण धारकांना हक्काच्या पी.टी.आर.चे वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. श्रीमती पंकजाताई मुंडे, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे, माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित, जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर, माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन व अतिक्रमण धारकांना पि. टी. आरचे वाटप करण्यात आले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकात बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर पाच महिने २६ दिवसात निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याचा प्रयत्न केला. अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली बरीच विकासकामे कामे झाली. शहरातील मतदारांनी शिवछत्र परिवाराच्या बाजूने तीन दशकांनंतर कौल दिला. अजितदादांचा वादा पक्का होता म्हणून भरभरुन आशिर्वाद दिले. आता अपेक्षा वाढल्या आहेत. लोकांच्या अपेक्षा माझ्याकडे आणि माझ्या अपेक्षा तुमच्या दादा तुमच्या कडे आहेत असे सांगून गेवराई बायपास ते बायपास सिमेंट रस्ता गेवराई शहराची हद्दवाढ, अचानकनगर येथील नागरिकांना घरकुल, गेवराई शहर स्वच्छ करण्यासाठी भुमिगत गटार, सिंदफनेचे पुनर्जिवन या व ईतर कामासाठी निधी मंजूर करुन द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी बोलताना ना. पंकजा मुंडे म्हणाल्या की, अनेक वर्षे गेवराईची गोर गरिब जनता हक्काच्या पिटीआरची मागणी करत होती ती विजयसिंह पंडित यांनी पुर्ण केली. आ. विजयसिंह लोकांसाठी तळमळीने काम करत आहेत असे सांगून त्यांनी आ. विजयसिंह पंडित यांच्या कामाचे कौतुक केले.
महेश दाभाडे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल
कार्यक्रमात गेवराईचे माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी ना. अजितदादा पवार यांनी त्यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महेश दाभाडे यांच्यासह सचिन मोटे, कृष्णा मुळे, मंजूर बागवान, विलास सुतार, विलास थोरात यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमात गेवराई येथील साईनाथ सुर्यवंशी, मैनाबाई सानप, सलाउल्ला पठाण, बेबी शेख, सुनिता बनसोडे, संगीता गायकवाड, प्रल्हाद पाळेकर यांच्यासह आकरा नागरिकांना पिटीआरचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर पालिकेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित, युवानेते पृथ्वीराज पंडित यांच्यासह सर्व संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.