सिंदफणा नदीवरील निमगाव कोल्हापूरी बंधाऱ्याच्या विस्तारासाठी २२ कोटीच्या निधीला कॅबिनेटची मान्यता
ब्रह्मनाथ येळंब, टाकळगाव हिंगणी साठी देखील मिळाले ३७ कोटी
बीड। राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज शिरूर कासार आणि गेवराई तालुक्याला विकासाचं गिफ्ट दिलं आहे. शिरूर तालुक्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव कोल्हापूरी बंधाऱ्याच्या विस्तारासाठी २२ कोटी तर ब्रह्मनाथ येळंब व टाकळगाव हिंगणी (गेवराई) येथील बंधाऱ्यासाठी ३७ कोटी रूपये निधीला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ना. पंकजाताई मुंडे यांच्यामुळे या बैठकीत बीड जिल्ह्याला विकासाचं गिफ्ट मिळालं. जिल्ह्यातील
सिंदफणा नदीवरील निमगाव (ता. शिरूर, जि. बीड) कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी २२.०८ कोटी रुपये, सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरूर, जि. बीड) कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी १७.३० कोटी रुपये आणि सिंदफणा नदीवरील टाकळगाव (हिंगणी) (ता. गेवराई, जि. बीड) कोल्हापुरी पद्धती बंधारा याचा विस्तार आणि सुधारणेअंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरण करण्यासाठी १९.६६ कोटी रुपये अशा तीन कामांना बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
जिल्ह्यात पाऊल ठेवण्यापूर्वीच निधी आणला
ना. पंकजाताई मुंडे उद्या २ एप्रिल रोजी बीड जिल्हयात येत आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी जिल्हयात पाऊल ठेवण्यापूर्वीच हा निधी मंजूर करून घेतल्याने शेतकऱ्यांसह जिल्हावासियांनी आनंद व्यक्त केला आहे.