नियुक्त्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांची समिती
आ.सुरेश धस, आ.प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागरांनी केली होती मागणी
मुंबई प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागांमध्ये अधिकारी आणि आणि कर्मचारी यांची नियुक्ती बिंदुनामावलीनुसार झालेल्या नाहीत. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. यविषयी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.२६) रोजी मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत, बीड जिल्ह्यात झालेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेश ना.अजित पवार यांनी दिले आहेत. याबाबत आ.सुरेश धस, आ.प्रकाश सोळंके, आ.संदीप क्षीरसागर यांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच विधीमंडळात देखील हा मुद्दा अनेकवेळा उपस्थित केला गेला होता.
शासनाच्या विभागांमध्ये बिंदुनामावलीनुसार पदांची मागणी करून पदभरती करण्यात येते. परंतु पदभरतीनंतर नियुक्ती देताना तसेच बदली व प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी बिंदुनामवलीचा वापर केला जात नाही. त्यामुळे मागील काळात बीड जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट प्रवर्गाचेच अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड संख्येत नियुक्त झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक असमतोल निर्माण झाला असून त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर विपरीत स्वरूपात झालेला आहे. विशेषतः पोलीस विभागातील नियुक्ती आणि आंतरजिल्हा बदलीमध्ये व्ही.जे.एन.टी आणि एन.टी.डी. प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नियमापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात बैठक घेण्याची विनंती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्याकडे केली होती. त्यावर ना.अजित दादा पवार यांनी मंत्रालयात याविषयी विशेष बैठक घेतली.
बीड जिल्ह्यातील महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, शिक्षण विभागात नोकर भरती व बदली करताना मागच्याअनेक वर्षापासून बिंदुनामावलीचे पालन करण्यात आलेले नसल्याने त्याचा फटका खुल्या, ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना बसला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने या प्रकारणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित पवार यांनी दिले आहेत. चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी आ.प्रकाश दादा सोळंके, आ.सुरेश आण्णा धस, शासकीय विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.