Beed /गेवराई : गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्यावर प्रस्थापित घराण्याची दहशत आहे. पंडित-पवार हे एकमेकांचेच सगे सोयरे आहेत. त्यांना कधीच गरीब मराठा चालत नाही. त्याला हिन वागणूक देण्याचे काम या दोन्ही प्रस्थापितांनी केले. पण आता याच गरीब मराठ्यांचा स्वाभीमान जागा झाला असून ते प्रस्थापितांविरोधात बंड करण्याच्या तयारीत आहेत. पवार आणि पंडित हे केवळ निवडणुकीपुरताच ऐकमेकांना विरोध करतात. एका ताटात खाताना ते ऐकमेकांना भांडून खातात. पण भांडताना ताटातून काही खाली पडून ते तिसर्याच्या वाट्याला येऊ नये याची काळजी ते घेतात, असा घाणाघाती आरोप महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार पूजाताई मोरे यांनी प्रचारादरम्यान केला.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, प्रत्येक गावागावात जात गाठीभेटीवर भर दिला जात आहे. गेवराई विधानसभेतून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार शेतकरी नेत्या पूजाताई मोरे यांनी प्रचारात प्रचंड मोठी आघाडी घेतली असून, त्यांनी गाव, वस्त्या, तांड्यावर जात प्रत्येक मतदारांशी संपर्क साधला आहे. मतदार संघातील कुरणपिंपरी, मालेगाव खू., बोरगाव मालेगाव बु., गुंतेगाव, वडाचीवाडी, पाथरवाला, उमापूर आदी गावांना भेटी देत गावकर्यांशी संवाद साधला. वरील सगळ्या गावांमध्ये पूजाताई मोरे यांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गावकर्यांशी संवाद साधताना पूजाताई मोरे म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून गेवराई तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्याला घराणे शाहीचे ग्रहण लागले असून लायक नसणारे पवार-पंडित घराण्यातील मुलेच आमदार बनत आहेत. गरीबाची मुलेही हुशार असतात, त्यांना चांगल्या प्रकारे बोलता येते, त्यांना समज असते मात्र ते अशा राजकीय घराण्यात जन्माला येत नसल्याने त्यांना संधी मिळत नाही. तालुक्यामध्ये प्रस्थापित असलेले पंडित-पवार यांनी तालुका वाटून घेतला आहे. ते एकमेकांचे सगे सोयरे असून, निवडणुकीपुरतेच ते लढतात, मात्र एरवी नगरपालिका, कारखाना, वाळू व्यवसाय या एकमेकांच्या धंद्याबाबत ते कधी काही बोलत नाहीत आणि आवाजही उठवीत नाहीत. तालुका दोघांच्या हातातून जाऊ द्यायचा नाही अशी यांची सांगड असून, यातून मलिदा लाटण्याचे काम यांच्याकडून होते असा आरोप पूजाताई मोरे यांनी बोलताना केला. त्या पुढे म्हणाल्या की, पवार हे पंडिताना शिव्या घालतात, त्यांना नावे ठेवतात पण ते एवढे खराब आहेत तर त्यांच्या घरात मुली का दिल्या? एक गरीबाचं लेकरू पुढे जाण्यासाठी धडपडत असेल तर त्याला पुढे जाऊ दिले जात नाही. प्रस्थापितांना धडा शिकविणे ही काळाची गरज असून यासाठी तुमच्यातल्याच शेतकर्याच्या कष्टकर्यांच्या लेकराला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकर्यांचा मुलगा आणि प्रस्थापित घराण्यातला मुलगा कसा असतो याचे उदाहरण देताना खासदार निलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे उदाहरण दिले. विखे पाटील बॅगमध्ये चांगली महागडी बूट घेऊन जातात तर खासदार निलेश लंके हे शेतकर्यांच्या प्रश्नासाठी बॅगमध्ये कांदे घेऊन जातात आणि संसदेमध्ये आवाज उठवितात. असा फरक शेतकर्यांच्या मुलात आणि प्रस्थापितांच्या घराण्यामध्ये असतो असे त्यांनी ग्रामस्थांना उदाहरणासह पटवून दिले. शेतकर्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी सभागृहात बोलावे लागते, ज्यांना शेतकर्यांशी देणे घेणे नाही ते आवाज उठवत नाहीत. त्यासाठी मला मतदानरुपी साथ द्या, मी शेतकरी आणि कष्टकर्यांचा आवाज तिथं पर्यंत पोहोचवील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
क्रांती करणे मतदारांच्या हातात
पूजाताई मोरे म्हणाल्या की क्रांती करणे हे मतदारांच्या हातात आहे. तुम्ही एकदा मतदान केले की पाच वर्षे त्या उमेदवाराला काहीच विचारत नाहीत. म्हणून त्यांचे फावते आहे. मतदार राजा सर्वात मोठा असून हक्काचा आवाज तयार करायचा असेल तर तुम्हाला क्रांती करावी लागणार आहे, बदल घडवावा लागणार आहे असे त्या म्हणाल्या.
ग्रामस्थांकडून वाजत गाजत स्वागत
पूजाताई मोरे यांचे प्रत्येक गावामध्ये वाजत गाजत आणि अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने स्वागत करीत मत देण्याचे आश्वासन दिले. ग्रामस्थांचा उत्साह आणि केलेले स्वागत पाहून पूजाताई सुद्धा यावेळी भारावून गेल्या.