बीड, प्रतिनिधी- गेल्या चाळीस वर्षांपासून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या लबाड क्षीरसागरांना धडा शिकवायचा असेल तर आता अठरा पगड जाती-धर्मातील माणसांची एकजूट होणे गरजेचे आहे. आलटून-पालटून क्षीरसागरांचे नवनवीन चेहरे समोर येतात, विकास पुरुष म्हणून स्वतःची ब्रँडिंग करतात आणि सामान्य जनतेला लुटत राहतात. सत्ता स्वतःच्या घरात टिकवून ठेवण्यासाठी क्षीरसागर आपापसात भांडण्याचे नाटकं करून बीडकरांची दिशाभूल करतात. मात्र लक्षात ठेवा हे सगळे क्षीरसागर एकच आहेत. आजवर जे झालं ते झालं पण आता ही वेळ क्रांतीची आणि परिवर्तनाची आहे. बीडवासियांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी, बीड विकसाचा कायापालट करण्यासाठी एकजुटीने कामाला लागा. असे आवाहन बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना केले.
काल दि. 5 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील समर्थक, मराठा सेवक तसेच सर्व जाती-धर्मातील अनिलदादांच्या समर्थकांनी मिळून बीड शहरातील जालना रोड वरील अनिलदादा जगताप मध्यवर्ती कार्यालय येथे विधानसभा पूर्व नियोजन तथा निश्चय बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांनी उपस्थित राहून सर्वांशी मुक्त संवाद साधत पुढील दिशा, ध्येयधोरण यावर सविस्तर चर्चा केली. बैठकीचे प्रास्ताविक प्रतिक कांबळे यांनी केले तर गणेश मस्के, संदीपान बडगे, साहेबराव पोपळे, मधुकर शिंदे महाराज, मुकेश रसाळ, किशोर गिराम, प्रदीप माने, संतोष जाधव, सुनिल सुरवसे, महादेव रकटे, प्रकाश खांडे सर, पप्पूजी बरीदे या सर्वांनी मिळून अनिलदादांना विजयाचे समीकरण जुळवून आणण्यासाठी शहर-गावखेड्यात कोणत्या योजना/यंत्रणा राबविणे अत्यावश्यक आहे यांसदर्भात मार्गदर्शन सूचना केल्या तसेच अनिलदादा केवळ तुम्हीच आपल्या बीडवासियांना क्षीरसागरांच्या तावडीतून वाचवू शकता, आम्ही जीवाचं रान करू पण यंदा विजयाचा गुलाल तुमच्या कपाळी लावू आणि बीड क्षीरसागर मुक्त करण्यासाठी लढा देऊ असा ठाम निश्चय या बैठकीत सर्व जाती-धर्मातील बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांच्या समर्थकांनी केला. याप्रसंगी मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील समर्थक, मराठा सेवक तसेच सर्व जाती-धर्मातील माणसं उपस्थित होते.