बीड : बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात निर्भय, पारदर्शक आणि नि:ष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक (पोलिस) मल्लिका सुरेश (भा.पो.से) यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांसह, निवडणूक प्रक्रियेतील सर्व नोडल अधिकारी यांना आज दिल्या. यावेळी गेवराई, माजलगावच्या निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) लालटनपुई वाँगचाँग, केज-परळीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) सुनील अंचिपका यांचीही उपस्थिती होती.
बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नोडल अधिकारी यांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक निवडणूक निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, प्र. अपर जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी श्रीमती अर्पिता ठुबे (भा.प्र.से), बीडचे अपर पोलिस जिल्हा अधीक्षक बीड सचिन पांडकर, अंबाजोगाईचे अपर पोलिस जिल्हा अधीक्षक चेतना तिडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे, चंद्रशेखर केकाण, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी, आदींसह सर्व विभागाचे नोडल अधिकारी, पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पाठक यांनी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या एकूण तयारीबाबत सविस्तर माहिती निवडणूक निरीक्षक यांना सादर केली. तर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. बारगळ यांनी जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय मतदान केंद्रे, मतदान केंद्रावरील पोलिस बंदोबस्त, उपलब्ध मनुष्यबळ, निवडणूक प्रक्रियेअंतर्गत करावयाची प्रतिबंधात्मक कार्यवाही, अंमलबजावणी आदींसह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर माहिती निवडणूक निरीक्षक यांना दिली. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्व कार्यवाहीची प्र. अपर जिल्हाधिकारी श्री. स्वामी यांनीही माहिती दिली. पोलिस विभागाकडून करण्यात आलेल्या व करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवडणूक निरीक्षक यांना सविस्तर माहिती दिली.