मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट
प्रतिनिधी : बीड
बीड विधानसभा निवडणुकीत आता राज्याच्या बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त चिफ इंजिनिअर ( मुख्य अभियंता) दिगांबर मळेकर हेही मैदानात उतरले आहेत. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशानुसार मळेकर यांनी मंगळवारी अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी आंतरवाली येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य असेल असे मळेकर यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील आर्वी येथील रहिवासी असलेले दिगांबर मळेकर हे राज्याच्या बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता आहेत. राज्यात अनेक महत्वाचे प्रकल्प त्यांच्या नेतृत्वात पूर्ण झाले आहेत. खरवंडी ते राजूरी हा राष्ट्रीय महामार्ग व तिंतरवणी ते पाडळी राज्य मार्गाच्या मंजूरीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. प्रशासनाचा तगडा अनुभव त्यांना आहे. मतदार संघाच्या विकासासाठी एक उच्च शिक्षीत उमेदवार म्हणून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मळेकर सक्रिय आहेत. बीड विधानसभेसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत अंतिम निर्णय नंतर घेऊ असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे दिगांबर मळेकर यांनी मंगळवारी अर्ज भरला. अर्ज भरल्यानंतर त्यांनी श्री क्षेत्र नारायण गड येथे जाऊन नगद नारायण महाराज व महंत शिवाजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले. अर्ज भरताना त्यांच्या समर्थकांची उपस्थिती होती.
पाटील यांचा आदेश अंतिम
मी बीड विधानसभेसाठी इच्छुक म्हणून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यांना मी उमेदवारी मागितली होती. जरांगे पाटील यांच्या निर्देशानुसार मी अर्ज भरला आहे. त्यांचा निर्णय अंतिम असेल अशी प्रतिक्रिया मळेकर यांनी अर्ज भरल्या नंतर दिली.