बीड : बीड लोकसभा मतदार संघामध्ये शांततापूर्ण निवडणूक होण्यासाठी संपूर्ण यंत्रणांनी सज्ज रहावे,असे आवाहन निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांनी आज केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात निवडणूक निरीक्षक अजीमुल हक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस कायदा व सुव्यवस्था पोलीस निरीक्षक योगेश यादव, खर्च निरीक्षक सुसांताकुमार बिश्वास, जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह निवडणुकीसाठी नेमलेले वरिष्ठ अधिकारी, सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी, तहसीलदार, नोडल अधिकारी उपस्थित होते.
श्री हक पुढे म्हणाले, सोमवार दिनांक 13 मे ला बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुका असून या दृष्टीने जवळपास सर्व तयारी झालेली आहे. सहाय्यक निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांचे निवडणूक काळात बजावयाचे कर्तव्ये ‘रिटर्निंग ऑफिसर हँडबुक’ मध्ये दिलेले असून त्याचे स्वतः वाचन करून तंतोतंत पालन करावे. अधिनस्त येणाऱ्या सर्व विधानसभा मतदार संघातील यंत्रणेचा आढावा घेऊन निवडणुका शांततेत होतील याची दक्षता घ्यावी.
आतापर्यंत झालेल्या दोन टप्प्यातील शहरी भागातील मतदानाची टक्केवारी कमी असल्याने स्वीप अंतर्गत उपक्रमांना अधिक सक्रिय करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पुढील दिवसात गृह मतदान होणार असून याबद्दलचे प्रात्यक्षिक सूक्ष्म निरीक्षकांना दाखवून त्यांचे योग्य प्रकारे प्रशिक्षण घेण्याचे ही निर्देश श्री हक यांनी यावेळी दिले.
निवडणुकीच्या काळात उष्णतेची लाट असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मतदान केंद्रात पुरेसे पाणी, ओ आर एस, वैद्यकीय सुविधा, मंडपाची व्यवस्था असावी याचीही दक्षता सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे भंग होणार नाही याकडे निक्षून लक्ष देण्याबाबतच्या सूचना केल्या.
शांतता सुव्यवस्था कायम राहण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने शांततापूर्ण निवडणूक पाडण्यास अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल कराव्यात असे निर्देश कायदा व सुव्यवस्था निरीक्षक श्री यादव यांनी यावेळी केल्या.
काही मतदान केंद्राच्या ठिकाणी दूरध्वनीचे संचार माध्यम नसल्याने मोबाईलची सुविधा त्या ठिकाणी असावी आणि मोबाईल नेटवर्क असल्याची दक्षता घ्यावी. सायबर सेलच्या माध्यमातून समाज माध्यमात फिरणाऱ्या आक्षेपार्ह आणि फेक न्यूज वर नियंत्रण ठेवण्याचे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. निवडणुकीच्या काळात निमलष्करी सैनिक येणार असून त्यांना समजतील अशा भाषेत सूचना कराव्यात.
मतदानाची तारीख जवळ आली असून एसएसटी पथकाने सतर्कतेने वाहनाची तपासणी करावी. अमली पदार्थ तसेच रोख रक्कम विविध मार्गातून येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे कसून तपासणी करावी अशा सूचना खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास यांनी यावेळी केल्या. शाळेच्या बॅग, पोत्यात भरून अथवा अन्य छुप्या पदृधतीने रोख रक्कम जिल्हयात आणली जाऊ शकते. कुठल्यातरी एका एटीएम मधून वारंवार एकच कार्डाच्या माध्यमातून पैसे काढले जाणे, बँकेच्या पासबुक वर विषम तारखेनुसार पैसे जमा होणे याकडेही कटाक्षाने लक्ष देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.