बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे डमी उमेदवार आहेत
हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार अशोक हिंगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल!
बीड / प्रतिनिधी
बीड लोकसभा निवडणुक विकासाच्या मुद्या ऐवजी जातीय मुद्द्यावर घसरली असून ओबीसी समाजाच्या नेत्या समजणाऱ्या भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना बीड जिल्ह्यातील ओबीसी समाज मोठ्या संख्येने विरोध करू लागला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे डमी उमेदवार असून वंचित बहुजन आघाडीची खरी लढाई भाजपासोबत होणार आहे. यामुळे पंकजाताई मुंडे यांच्या पायाखालची जमीन सरकली असून कसल्याही प्रकारच्या वल्गना करून ओबीसी समाजाची मतं घेण्यासाठी त्यांची सुरू असलेली तडफड कामे येणार नाही असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखाताई ठाकूर यांनी व्यक्त केले असून येत्या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये अशोक हिंगे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आज गुरुवार दि. 25 एप्रिल 2024 रोजी भव्य रॅली काढून वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत निघालेल्या या रॅलीने बीडकरांचे लक्ष वेधले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या या महा रॅलीचा शुभारंभ डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आला. हिरालाल चौक, माळी वेस सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या रॅलीचे प्रस्थान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे होऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथून जवळच असलेल्या पारस नगरीमध्ये भव्य सभेत या रॅलीचे रूपांतर झाले. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा समारोप पारस नगरी येथे करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना रेखाताई ठाकूर पुढे म्हणाल्या की, आम्ही जातीपातीचे राजकारण करीत नाहीत, वंचित बहुजन आघाडीच्या रक्तात देखील जात नावाचा प्रकार येत नाही. आमचं राजकारण विकासावर आधारित आहे. जिल्ह्याचा, विभागाचा आणि राज्यासह देशाचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे प्रयत्न करीत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला सर्वधर्मसमभाव पाळणारा भारत देश उभारण्याचे स्वप्न या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही उराशी बाळगलेले आहे. भाजपा महायुतीच्या सरकारने देश विक्रीस काढला आहे. मात्र या धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील राहणार आहे.
याप्रसंगी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे म्हणाले की, माझी लढाई फक्त भाजपासोबत आहे. आज हजाराच्या संख्येने माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जमा झालेला वंचित समाज माझ्या विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाशी माझी लढाई होईल असा अपप्रचार कोणीही करू नये. महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे डमी (डी. एम.) उमेदवार आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित असल्याचे अशोक हिंगे यांनी याप्रसंगी बोलून दाखवले.
या सभेप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिस्तपालन व तक्रार समितीचे अध्यक्ष प्रा. विष्णू जाधव, मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड, इंजि. विष्णू देवकते, जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, महासचिव मिलिंद घाडगे, ज्ञानेश्वर कवठेकर, प्रा. निनाळे, महिला जिल्हाध्यक्ष अँड.अनिता चक्रे, लातूर महिला जिल्हाध्यक्ष मंजूशाताई निंबाळकर, प्रा. डॉ.छायाताई हिरवे, पुष्पा तूरुकमारे, गोरे,नंदा भंडारे, डॉ. नितिन सोनवणे, अनिल डोंगरे, धम्मानंद साळवे, सुरेश पोतदार,अंकुश जाधव, युनुष शेख, दगडु गायकवाड, एस.ए. सोनवणे, पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर, धम्मानंद कासारे, सचिन उजगरे, परमेश्वर लांडगे, अँड.राजेंद्र कोरडे, बाळासाहेब गायकवाड, दिलीप माने, किरण वाघमारे, डॉ.संजय नाकलगावकर, गौतम साळवे, गफार शाहा, लखन जोगदंड, संदीप जाधव, प्रेम जगतकर सूत्रसंचालन अजय सरवदे यांनी केले.यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
भाजपाच्या नेत्यांनी केला ॲड. प्रकाश आंबेडकरांना बीड जिल्ह्यात येण्यास मज्जाव
वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा बीड जिल्ह्यातील दौरा सुनिश्चित असताना भाजपा आणि महायुतीच्या नेत्यांनी सर्व हेलिकॉप्टर बुक करून त्यांना बीड जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीड लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांनी केला आहे.