लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांच्या फोटोचा वापर करून बबनराव माने यांनी जनतेची व ऊसतोड कामगारांची दिशाभूल करू नये.. नवनाथ प्रभाळे
बीड :– लोकनेते विनायकराव मेटे यांनी बबन माने यांना पंचायत समिती सदस्य केले होते व पक्षातही मानसन्मान दिला होता. परंतु बबन माने यांनी पक्षाशी व मेटे साहेबांशी प्रतारणा करून विरोधी लोकांशी संधान बांधले त्यामुळे त्यांना यापूर्वीच शिवसंग्राममधून बेदखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे माजी पंचायत समिती सदस्य बबन माने यांचा शिवसंग्राम संघटनेशी यापुढे कसलाही संबंध असणार नाही .अशी माहिती शिवसंग्रामच्या वतीने तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी काल प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांनी मागील पंचायत समिती निवडणुकीत बबनराव माने यांना शिवसंग्रामचे तिकीट देऊन निवडून आणले होते. याच बरोबर शिवसंग्राम संघटनेची ऊसतोड मजूर व वाहतूकदार संघटनेची जबाबदारीही दिलेली होती. परंतु मेटे साहेबांच्या पश्चात शिवसंग्राम संघटनेशी प्रतारणा करून त्यांनी आपली वेगळी चूल मांडलेली आहे. शिवसंग्राम संघटनेच्या विचारधारेशी फारकत घेतलेली आहे.त्यांनी स्थापन केलेल्या ऊसतोड मजूर संघटनेशी शिवसंग्रामचा कसलाही संबंध नाही. शिवसंग्रामचे ते यापुढे प्राथमिक सदस्यही असणार नाहीत त्यामुळे त्यांनी लोकनेते विनायकरावजी मेटे साहेबांचा फोटो वापरून शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते,ऊसतोड मजूर, वाहतूकदार तसेच सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करू नये. अन्यथा पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व ऊसतोड कामगार मुकादम व वाहतूकदार यांना कळविण्यात येते की बबन माने यांचा शिवसंग्राम पक्ष संघटनेची काहीही संबंध नाही. लोकनेते मेटे साहेबांवर निष्ठा असणाऱ्यांनी बबन माने यांच्या नियोजित आंदोलन व कार्यक्रमास उपस्थित राहू नये. असे आवाहन शिवसंग्राम च्या वतीने करण्यात येत आहे.
शिवसंग्राम पक्ष संघटनेच्या विरोधी लोकांसोबत संधान साधून वेगळी चूल मांडलेल्या बबन माने यांचे शिवसंग्रामचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांनी कळविले आहे.