आ.संदीप क्षीरसागरांनी उपस्थित राहून उत्साह वाढविला
बीड प्रतिनिधी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राजुरी (न.) येथील गणेशोत्सवाच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. तसेच महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लिंबागणेश येथील एक गाव एक गणपती उपक्रमातील मयुरेश्वर गणपतीचे शनिवार (दि.२३) रोजी पाचव्या दिवशी विसर्जन केले.
राजुरी (न.) येथे गेल्या अनेक पिढ्यांपासून गणेशोत्सव, अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून साजरा केला जातो. यावर्षीही गणेशोत्सवादरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकारांनी या सप्ताहास आपली सेवा दिली. शनिवार (दि.२३) रोजी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत प्रेममूर्ती ह.भ.प. शिवाजी महाराज नारायणगडकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. यावेळी किर्तन श्रवणासाठी आ.संदीप क्षीरसागर आवर्जून उपस्थित राहीले होते. हा महोत्सव आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह राजुरी येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. तसेच महाराष्ट्रभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र लिंबागणेश येथेही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एक गाव एक गणपती या उपक्रमातून श्री मयुरेश्वर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. शनिवारी पाचव्या दिवशी श्री मयुरेश्वर गणपतीचे चंद्रपुष्कनी विहीरीच्या तिर्थात मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले. यावेळी आ.संदीप क्षीरसागर उपस्थित होते.