आंदोलनस्थळी व अंबड येथील रुग्णालयात भेट घेऊन केली विचारपूस
बीड दि.२ (प्रतिनिधी):- आंतरवली (सराटी) येथे मराठा आंदोलकांवर काल पोलीसांकडून प्रखर लाठीमार करण्यात आला होता. या घटनेत अनेक आंदोलनकर्ते मराठा समाजबांधव, महिला भगिनी, वृध्द, लहान मुले जखमी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या सोबत आ.संदीप क्षीरसागर यांनी उपोषणकर्ते व सर्व जखमी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
दि.२९ ऑगस्ट पासून जालना जिल्ह्यातील आंतरवली (सराटी) गावात मराठा समाजबांधवांच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश आंदोलन सुरू होते. श्री.मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू होते. सलग चार दिवस उपोषण केल्याने श्री.जरांगे यांची तब्येत बिघडली. त्यामुळे धास्तीने आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलन कर्त्यांवर प्रखर लाठीमार केला. ज्यात तरूणांसह महिला, लहान मुले, वृध्द यांनासुद्धा मारहाण करण्यात आली. यात बरेचजण जखमी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यासोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आंतरवली (सराटी) येथील आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची व अंबड येथील रूग्णालयात जखमींची भेट घेतली असून या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.