जिल्ह्यात पहिलेच ४८ बोगस शिवभोजन केंद्र असताना परत १५ शिवभोजन केंद्र देण्याची तयारी सुरु
प्रारंभ | वृत्तसेवा
बीड : राज्यातील गोरगरीबांना एकवेळचे पोटभर अन्न मिळावे यासाठी राज्यशासनाच्या वतीने राज्यभरात शिवभोजन योजना राबविण्यात येत आहे. याच शिवभोजन योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यात एकूण ४८ शिवभोजन केंद्रअसून या ४८ ठिकाणी ४४०० शिवभोजन थाळीला मंजूरी आहे. परंतु शिवभोजन केंद्र देताना जिल्हा पुरवठा विभागाकडून कसल्याही प्रकारचे नियमाचे पालन करण्यात आले नाह. हा प्रकार ताजा असतानाच यात परत आता १५ शिवभोजन केंद्र देण्याची तयारी जिल्हा पुरवठा विभागाकडून होत आहे. या संदर्भातच्या फाईल तयार असून अंतिम सहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवल्याचीही माहिती मिळत आहे. आधीच बोगसपणा सुरू असून त्यात परत १५ फाईल देण्याची तयारी पुरवठा विभागातील अधिकारी व काही कर्मचाऱ्यांनी सुरू केल्यामुळे गोचीडासारख्या चिकटलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकप्रकारे लाजाच सोडल्याचे दिसत आहे.
बीड जिल्ह्यामध्ये एकूण ४८ शिवभोजन केंद्र असून या केंद्रावर ४४०० शिवभोजन थाळीला मंजूरी आहे. विशेष म्हणजे हे शिवभोजन केंद्र देताना संबंधित अधिकाऱ्याकडून कसल्याही प्रकारे नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. राज्य शासनाच्या जीआरप्रमाणे ही शिवभोजन केंद्र, खाणावळचालक, एंजिओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट यांना देण्याची तरतूद आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी ही शिवभोजन केंद्रअनाधिकृतपणे ९० टक्के कार्यकर्त्यांना वाटलेली आहे. हा सर्व बोगसपणा प्रारंभने उघडकीस आणल्यानंतर सुद्धा या सर्व प्रकारावर जिल्हा पुरवठा विभागाकडून पांघरून टाकण्याचा प्रकार होत असतानाच त्यात परत नवीन १५ शिवभोजन केंद्र देण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. तर ही शिवभोजन केंद्र सुद्धा कार्यकर्त्यांनाच खैरातीसारखी वाटण्याची तयारी येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दाखवली आहे.