श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
बीड प्रतिनिधी : गुरूवर्य शांती ब्रम्ह नवनाथ महाराज व श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी देवस्थानच्या आशिर्वादामुळे मला समाजसेवा करण्याची संधी मिळाली असून ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. अतिशय सुंदर अशा सोहळ्यास सर्व संत महंतांनी उपस्थित राहून शोभा वाढवली. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात केले. तसेच यावेळी स्व.विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
बीड तालुक्याचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी देवस्थान येथे, विसाव्या शतकातील महान संत ह.भ.प.स्व.किसन बाबा यांच्या २५ व्या पुण्यतिथी निमित्त रौप्य महोत्सव सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची सांगता गुरूवारी (दि.३१) रोजी रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या सुश्राव्य किर्तनाने झाली. याप्रसंगी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर उपस्थित होते. त्यांनी यावेळी स्व.विनायकराव मेटे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. तसेच ११ लाख रूपयांची वैयक्तीक देणगी जाहीर केली. या अगोदरही आ.संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी याठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण झाले आहेत. या गोष्टीचाही मनस्वी आनंद असल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले.
जाधववाडी, चर्हाठा येथील कार्यक्रमांस उपस्थिती
बीड तालुक्यातील जाधववाडी येथे श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला आ.संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली. तसेच चर्हाठा येथील दर्गा शरीफ हजरत बादशहा यांच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहून आ.क्षीरसागर यांनी आशिर्वाद घेतले.