नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्याची शक्ती, अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज – धनंजय मुंडे
धनंजय मुंडेंनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा घेतला आढावा
बीज उत्पादनात नवीन संशोधन करा, मातीच्या परिक्षणाची सवय लावा – मुंडेंच्या सूचना
मुंबई – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्याची शक्ती आहे. त्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असून बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या माती परीक्षणाचे कामही तातडीने होऊन त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी पोस्टाच्या यंत्रणेचा वापर करण्यात यावा तसेच विद्यापीठांमध्ये माती परीक्षणाचे काम उभारणारी यंत्रणा अधिक वाढवण्यात यावी, अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिल्या आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची आढावा बैठक आज मंत्रालयात श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
बदलत्या काळात वातावरणात नेहमी बदल घडत आहेत, त्याला अनुसरून खरिपात आंतरपिके घेता यावीत व त्यातून अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना घेता यावे यासाठी सूर्यफूल, तूर, उडीद, मूग यांसारख्या बियाण्यांवर अधिक कृषी विद्यापीठांच्या मार्फत संशोधन करण्यात यावे.
विद्यापीठाने वेळोवेळी मातीचे परीक्षण करावे व त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, या बाबीची सवय लावली पाहीजे, असेही मत धनंजय मुंडे यांनी या बैठकीत व्यक्त केले.
बदलत्या वातावरणानुसार अधिक प्रभावी ठरतील अशा प्रकारचे बियाणे निर्मिती करण्याचे प्रकल्प उभे करण्याचे काम शासनाच्या मार्फत हाती घेण्यात येणार असून, यादृष्टीने प्रयत्न सुरू करावेत, अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंह, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव महेंद्र घाडगे, वित्त विशेषज्ञ प्रगती धनावडे, जलशास्त्रज्ञ डॉ. मुंजाजी भोसले, कृषी व्यवसाय विशेषज्ञ डॉ. मेघना केळकर, कृषी अभियंता सागर खळकाटे, आशुतोष भुजबळ, जी आय एस तज्ञ नितीन बनकर, मुद्रा विशेषज्ञ विजय कोळेकर, प्रापण तज्ञ रवींद्र देसाई, प्रकल्प उप संचालक प्रताप गित्ते, तंत्र अधिकारी समीर राजे यांसह आदी उपस्थित होते.