प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : शहरातील केएसके महाविद्यालयातील एका बँचवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा प्रकार आज उघडकीस आला. यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी जमाव झाला होता. यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी भेट देत जमावाला शांत करत याप्रकरणी अज्ञात व्यक्तीसह एका शिक्षकावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
बीड शहरातील केएसके महाविद्यालयात आज जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचा महसूल सप्ताह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे कॉलेजमधील सर्वच शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते, याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कॉलेजमधील एका बँचवर आक्षेपार्ह मजकूर लिहिला, ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर मोठा जमाव केएसके कॉलेज याठिकाणी व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमा झाली होता. याची माहिती पोलीसांना मिळताच दोन्ही ठिकाणी पोलीसांनी धाव घेत जमावाला शांत केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीसह एका शिक्षकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीड शहरातील जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, के एस के कॉलेज बीड येथे धार्मिक भावना दुखावल्याचे कारणावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित व्यक्तीस अटक करून पोलीस प्रशासनतर्फे कठोर कारवाई करण्यात येत आहे. तरी बीड शहरातील जनतेने कोणत्याही अफवाना बळी पडून कायद्याचे उल्लंघन करू नये.
-संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग,बीड