राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद
बीड/प्रतिनिधी: बीडमध्ये येत असताना रस्त्यांची दुरावस्था दिसली. इथले आमदार सत्तेत होते तरी ही अवस्था कशी?, अशी माहिती घेतली असता इथे रस्त्यात टोल नसून विकास कामात ‘टोल’ आहेत, असे कळले. येणाऱ्या काळात हा ‘टोल’ बंद केला जाईल. सभागृहात आलो तेव्हा दिसलेली गर्दीच बळीराम गवते यांचे भवितव्य मोठे असल्याचे दाखवून देत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले.
दि.२४ रोजी सुरज चव्हाण हे बीड जिल्हा दौऱ्यावर आले होते. येथील निलकमल हॉटेल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आली होती. व्यासपिठावर बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते बळीराम गवते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर, नंदू कुटे, बाळासाहेब गुजर, उत्तरेश्वर सोनवणे, मोहन देवकते यांची उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सुरज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात झालेले बदल सर्वश्रूत आहेत. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय हा विकासासाठी आहे. महाराष्ट्राला अजित पवार यांच्यासारख्या अभ्यासू, प्रशासनावर वचक असलेल्या नेत्याची गरज आहे.ते सकाळी सहा वाजता लोकात जाऊन बसतात. त्यांचे प्रश्न जाणून घेतात आणि सोडवितातही. यामुळे राज्यात दादांचा दबदबा आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गवते यांनी पाठिंबा दिला. आजच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी बीडची हा सांगत आहे.हीच गर्दी कायम ठेवून येणाऱ्या काळात गवते यांना वाडी-वस्त्यांवर पायाला भिंगरी लावून फिरावे लागणार आहे.सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पक्षबांधणीसाठी जी काही मदत लागेल ती मदत आम्ही करू, त्याबाबत निश्चिंत रहावे, असे सांगत बीडमध्ये विकास कामात असलेला टोल बंद करण्याचे काम आपण करणार आहोत. तुम्हा सर्वांना दादांचा स्वभाव माहित असून दादांनी एकदा कोणाला आमदार करायचे ठरविले तर करतात आणि कोणाला घरी बसायचे ठरविले तर ते बसवितात. बीड मतदारसंघात बळीराम गवते यांचे भवितव्य मोठे आहे, असेही सुरज चव्हाण म्हणाले.
गुलालाचा शुभशकून
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीला मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, सोमनाथवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडही दुपारी झाली. सरपंच म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या पाच मिनीटात सरपंच शेळके हे गुलाल घेवून बैठकीला हजर राहिले. गुलाल घेवून आलेले कार्यकर्ते शुभशकून असल्याची चर्चा कार्यकर्त्यात होती.
आता फोन कसे? चार वर्षे कामे का केली नाहीत: गवते
आपला भाग दुष्काळी आहे परंतु आता आपल्याला हक्काचे आणि शेतकऱ्यांचा कैवारी असलेले धनंजय मुंडे हे कृषीमंत्री म्हणून लाभले आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याला फायदा होणार आहेच परंतु बीड तालुक्यातील विकासासाठीही ते आपल्या पाठिशी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना आम्हाला पुर्वी भेटता येत नव्हते, आता कार्यकर्ते थेट भेटत आहेत. परंतु काही लोक आमच्या कार्यकर्त्यांना आता फोन करून विकास कामे करू असे सांगत आहेत. कामेच करायची होती तर चार वर्षे का केली नाहीत, असा प्रश्न बळीराम गवते यांनी उपस्थित केला.