Beed : १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून नंतर ती गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी रणजित शिवदास शेंडगे ( रा. खापर पांगरी) याला बीड ग्रामीण पोलिस व पिंक पथकाने गजाआड केले.
बीड तालुक्यातील खापर पांगरी येथील एका १४ वर्षीय मुलीला लग्नाचे अनिष्ट दाखवून गावातीलच रणजित शिवदास शेंडगे याने सुमारे वर्षभर तिच्यावर अत्याचार केला होता. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला छत्रपती संभाजीनगरला नेऊन एका पत्र्याच्या शेडमध्ये तिचा गर्भपात केला होता. त्यानंतर तिच्या कुटुंबाला गावात राहू नये यासाठी दबाव टाकून पुण्याला पाठवले गेले होते. दरम्यान, या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडेही तक्रार केली गेली होती.
काही दिवसांपूर्वी पिडिता पुण्याहून आल्यावर तिने बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन मुख्य आरोपी रणजित शेंडगे सह त्याचा मदत करणारे त्याचे ३ मित्र, गर्भपात करणारे ४ जण अशा एकूण ८ जणांवर गुन्हा नोंदवला गेला होता. या प्रकरणातील सर्व आरोपी फरार होते. यातील मुख्य आरोपी रणजित शिवदास शेंडगे हा खापर पांगरी शिवारतील एका शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सहायक निरीक्षक घनश्याम आंतरप, उपनिरिक्षक राजाभाऊ गुळभिले व इतरांनी अटक केली. एसपी नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली.