राष्ट्रवादी भवन येथे पार पडली कार्यकर्ता बैठक
बीड प्रतिनिधी : शहरातील राष्ट्रवादी भवन येथे मंगळवार (दि.11) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक आ.संदीप क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी काहीही झाले तरी सदैव साहेब म्हणजेच राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार यांच्यासोबतच राहू अशी भूमिका कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्पष्ट केली. तसेच ज्यांनी भूमिका बदलल्या त्यांना येणार्या निवडणुकीतून योग्य उत्तर देऊ असे सांगितले.
खरंतर आपण बैठक घेण्याची गरजच नव्हती, बैठका घेण्याची खरी गरज ज्यांनी अंधारात भूमिका बदलल्या त्यांना आहे खूप सार्या आमदारांचे फोन आले. म्हणाले भैय्या तुम्ही आमच्याकडे या, कशामुळे तर आपल्याकडे मुख्यमंत्री पद आहे. मंत्रीपद मिळणार आहेत. महामंडळ येणार आहेत तुम्ही एकटेच तिकडे काय करणार? तुमच्याकडे काय आहे? तर मी म्हणालो की, माझ्याकडे पवार साहेब आहेत. येणार्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला तयारीला लागावे लागणार आहे. आपण याआधीही ज्या-ज्या वेळी वेळ पडली त्या-त्या वेळी आपण पक्ष आणि पवार साहेब यांचीच निवड केलेली आहे. हे झालंय ते खासदारकीसाठी केलेलं षडयंत्र आहे. जशा त्यांना नोटीस तशाच आता गेलेल्यांनाही नोटीसा येणार आहेत असा टोलाही आ.क्षीरसागरांनी अजित पवार गटात गेलेल्या पदाधिकार्यांना लगावला. मला कोणावरही टीका करायची नाही, ते मी कधीही करणार नाही. ज्याप्रकारे पवार साहेब निवडणुकीतूनच उत्तर देत असतात त्याप्रकारे आपणही येणार्या निवडणुकांच्या माध्यमातूनच सडेतोड उत्तर देऊ. आपल्याला येणार्या नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींच्या माध्यमातून उत्तर द्यायचे आहे. त्याकरिता सर्वांनी मिळून कामाला लागूयात. असे आ.क्षीरसागरांनी सांगितले. संघर्ष हा आपल्या रक्तात असून हा संघर्षाचा लढा आपण पुन्हा एकदा प्रामाणिकपणे लढू. येणारा काळ हा आपलाच असेल. अशाप्रकारे आ.क्षीरसागरांनी कार्यकर्त्यांना प्रेरित केले. यावेळी आ.क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेत पुढील वाटचाली संदर्भात रूपरेषा आखली. या बैठकीस माज आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे, अॅड.डी.बी. बागल, वैजीनाथ नाना तांदळे, रामदास हंगे, सरपंच, उपसरपंच, माजी नगरसेवक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.