कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधून दोन दिवसात जिल्हाध्यक्ष घेणार निर्णय
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राष्ट्रवादीचा एक मोठा गटच घेऊन शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, यानंतर मात्र राज्यभरातील कार्यकर्ते ज्या प्रकारे संभ्रमात आहेत, त्याच प्रकारे बीड जिल्ह्यात सुद्धा असाच प्रकार होत आहे. बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण हे संभ्रमात असून पवार साहेबांना पाठिंबा द्यावा की अजित पवार यांच्याकडे जावे हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे. लवकरच ते पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेशी संवाद साधून त्यांचा निर्णय दोन दिवसात घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही वर्षापासून राज्यातील राजकीय स्थिती अस्थिर बनली असून कोणता पक्ष कधी फुटेल हे सांगणे मात्र कठीण बनले आहे. गेल्या वर्षी आघाडी सरकार मधून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्यातील आघाडी सरकार कोसळले व शिंदे गटाने भाजप सोबत युती करत राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन केले. त्याला वर्ष होत नाही तोच, राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मोठा गट त्यांच्यासोबत घेऊन राष्ट्रवादीसह राज्याला हादरे दिले. यानंतर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेत सरकारमध्ये सहभागी सहभाग घेतला. यानंतर मात्र राज्यभरातील कार्यकर्ते संभ्रमात असूम यामध्ये बीडचे कार्यकर्ते सुद्धा आहेत. बीडचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्याकडे जावे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जावे हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. या सर्व बाबीच्या अनुषंगाने ते येथील पदाधिकारी, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व मतदारांशी संवाद साधून त्यांची भूमिका दोन दिवसात मांडणार असल्याची माहिती मिळत आहे.