बीड, प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी होते तेव्हा त्यांनी अनेक जबाबदार्या मिंदेंवर सोपवल्या होत्या. ज्या विश्वासाने जबाबदार्या टाकल्या त्याचाच विश्वासघात करत गैरफायदा घेत मिंदेंनी अविश्वासाचे घाव घातले. शिवसैनिकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक घाव मातोश्रीने सहन केले आहेत. ठाकरे घराण्याला संघर्ष नवा नाही. यातूनही भरारी घेवू असा विश्वास शिवसेनेचे जिल्हासंपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी व्यक्त केला.
बीड जिल्हासंपर्कप्रमुखपदी किशोर पोतदार यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीनंतर पहिल्यांदाच त्यांचे बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. आज बोलावलेल्या शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित ,माजी आमदार सुनील धांडे , लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे,यांच्यासह शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पुढे बोलताना संपर्कप्रमुख किशोर पोतदार म्हणाले, आज संघर्षाचा क्षण आहे. ठाकरे घराण्याला संघर्ष नवा नाही. यापूर्वीही विश्वासघाताचे अनेक घाव मातोश्रीने आणि ठाकरे घराण्याने सोसले आहेत.त्यातूनही शिवसेनेने पुन्हा भरारी घेतली आहे. आजही आपण प्रामाणिकपणे काम करूया, नक्कीच शिवसेना भविष्यात उत्तुंग भरारी घेणार आहे. मराठी माणूस आणि हिंदुत्वाची नाळ मातोश्रीसोबत घट्ट आहे. मलाही अनेकदा मिंदे गटाने गळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या गळाला मी लागलो नाही. शिवसेनाप्रमुखांनी सामान्य शिवसैनिकांना मोठे केले. जे मोठे झाले त्यांनी सामान्य शिवसैनिकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. यापुढे शिवसेनेत गट-तट आपण सहन करणार नाहीत. कोणी कोणत्या गटाचा नाही. आपण सर्वजण बाळासाहेब शिवसैनिक आहोत, मातोश्रीशी एकनिष्ठ आहोत, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षित काम तुम्हा, आम्हाला करावयाचे आहे असे किशोर पोतदार यांनी म्हटले. यावेळी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, रत्नाकर शिंदे, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित,माजी आमदार सुनील धांडे, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे ,माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, शिवाजी कुलकर्णी, हनुमंत पिंगळे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, जिल्हा संघटक नितीन धांडे, विलास महाराज शिंदे, शेख निजाम, गोरख सिंगण, विनायक मुळे, दीपक काळे, हनुमंत जगताप यांच्यासह जिल्हाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.