भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विश्वस्तांचे चोख नियोजन
रात्री 1 वाजता महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते होणार पूजा
वाहातूक कोंडी सोडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे नियोजन
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड याठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त भाविकभक्त मोठ्या संख्येने विठ्ठल-रखुमाई व नगदनारायण महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. या अनुषंगाने गडाच्या वतीने व पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. आज सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक संतोष वाळके, पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी श्रीक्षेत्र नारायण येथील परिसराची पाहणी केली. यावेळी गडाचे विश्वस्त बी.बी.जाधव, बळीराम गवते, पत्रकार दत्ता देशमुख, जालिंदर धांडे, केशव कदम, मुकेश झनझने, अशोक सुखवसे, जालू शिंदे यांची उपस्थिती होती.
धाकटी पंढरी म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या श्रीक्षेत्र नारायणगड याठिकाणी आषाढीच्या अनुषंगाने लाखो भाविक उद्या दर्शनासाठी येतात. आज दुपारनंतरच भाविक गडावर दाखल होणार असून आज रात्री 1 वाजता मुख्य पुजा व अभिषेक गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गडाचे विश्वस्त मंडळांची उपस्थिती असणार आहे. पूजा झाल्यानंतरच भाविकांसाठी मंदीर खुले होणार आहे. जे भाविक पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जावू शकत नाहीत असे भाविक मोठ्या संख्येने नारायणगडावर दर्शनासाठी येत असतात. गेल्यावर्षी सुद्धा लाखोंचा जनसमुदाय दर्शनासाठी गडावर आला होता परंतु मोठी वाहातूक कोंडी याठिकाणी झाल्यामुळे तासन्तास भाविकांना व लोकप्रतिनिधींना वाहातूक कोंडीत अडकून बसावे लागले होते. या सर्व बाबींच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने यावेळेस वाहातूक कोंडी होवू नये यासाठी विशेष नियोजन केले आहे. याच अनुषंगाने आज पोलीस प्रशासनाने येथील बंदोबस्ताचा आढावा घेतला.
गडाच्या 20 एक्कर परिसरात असणार पार्कींग
श्रीक्षेत्र नारायणगड परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनांसाठी पार्कींगची सोय करण्यात आली असून गडाच्या पायथ्याशी असणार्या 20 एक्कर जागेवर ही पार्कींगची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी स्वयंसेवकांसह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीडहून गडावर जाण्यासाठी यावेळेस दोन मार्ग असणार आहेत. एक म्हणजे बीड-नवगण राजूरी-बेलूरा तर दुसरा बीड-केतुरा-नारायगणगड असा मार्ग असणार आहे.