प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मागील अनेक वर्षांपासून तुम्ही ओळखत असलेल्या आणि तुमच्या प्रत्येक अपडेटला लाईक कमेंट करणाऱ्या तुमच्या जुन्या मित्राच्या नावाने नवी फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल तर सावधान! ती रिक्वेस्ट तुम्ही स्वीकारू नका. तुमच्या ते अंगलट येऊन त्यात तुमची फसवणूक होऊ शकते. यामुळे फेसबुकचा व इतर सोशल मीडियाचा वापर करताना सर्वांनीच काळजी घ्यावी असे वारंवार सायबर विभाग सांगत असताना सुद्धा आपण काही बाबीकडे दुर्लक्ष करतो. यामुळेच आपली फसवणूक होते, परंतु भविष्यात आपली फसवणूक होऊ नये यासाठी युवकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
डिजिटल युगामध्ये जवळपास सर्वच जण सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. यामध्ये आपल्या भागात फेसबुक मोठ्या प्रमाणात वापरले जाते. युवक वर्ग यामध्ये जास्त आहे. फेसबुक व सोशल मीडियाचे इतर प्लेट फॉर्म वापरताना आपण विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसापासून फेसबुक धारकांची विविध माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकार सायबर विभागामध्ये उघडकीस आलेले आहेत. बनावट अकाउंट उघडून संबंधित मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशाची मागणी होते व आपण तात्काळ ऑनलाईन पेमेंट करतो परंतु ते पेमेंट दुसऱ्याच कुणीतरी घेतल्याचे लक्षात आल्यानंतर पश्चाताप करून काहीच मिळत नाही. यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना आपण सर्वांनी विशेष खबरदारी घेत आपली होणारी फसवणूक टाळणे गरजेचे आहे. सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून यात सोशल मीडियावरील अचानक सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.
अशी घ्यावी खबरदारी
— आपल्या खात्याचा पासवर्ड वारंवार बदला
— कुणाचेही बनावट खाते आढळल्यास संबंधिताला कळवा.
—बनावट खाते बंद करण्याची सुविधा फेसबुकवरच आहे.
— उजव्या कोपऱ्यातील तीन डॉटमध्ये क्लिक करून अकांउट फेक असल्याचा रिपोर्ट करा.
फेसबुक खातेदारांनो अशी काळजी घ्या!
— तुमच्या फेसबुकचे प्रोफाइल लॉक करा.
— फक्त मित्रांनाच ते दिसावे
— अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
— प्रचंड लिंकवर विनाकारण क्लिक करू नका
— तुमच्या नाव व छायाचित्राचा वापर इतर कोणी करते का पाहा.
अशी घ्या विशेष दक्षता
— जुन्या मित्राची नवी रिक्वेस्ट आल्यास खात्री करूनच स्वीकारा.
— पैशाची मागणी करणाऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष संपर्क करा.
— तर्क लावा, ज्याच्याशी आपला कधी व्यवहार नाही, तो कशाला पैसे मागेल?
अशी होतेय फसवणूक
मित्र यादीतील मित्रांना नवी फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. या मित्रांनी रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर बनावट खातेधारक तुमच्या नावाने तुमच्या मित्रांना मॅसेंजरच्या माध्यमातून संवाद साधतो व तातडीची गरज असल्याचे फेसबुकच्या माध्यमातून पैशाची मागणी करून फसवणूक करण्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. तरीही केवळ निष्काळजीपणामुळे अनेकजण या फसवणुकीचे बळी ठरत आहेत. ज्यांचे फेसबुक खाते लॉक नाही, अशी खाती निवडून अथवा एखाद्या बनावट वेबसाइटला तुम्ही भेट
दिल्यानंतर तुमच्या फेसबुकमधील नाव व छायाचित्र वापरून नवी बनावट खाते उघडले जाते. पैशाची मागणी करतो. खात्री न करता पैसे पाठविल्यास फसवणूक होऊ शकते. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही केवळ निष्काळजीपणामुळे अनेकांची फसवणूक होत आहे.