उद्योग मंत्री उदय सामंत, आ. धनंजय मुंडे यांच्यासह एमआयडीसी व महसुली अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक
मुंबई – परळी तालुक्यातील शिरसाळा येथील औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या जमिनीसह सर्वे नंबर 122 मधील जमिन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याची महसुली प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीचे अधिकारी व बीड जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
दोनच दिवसांपूर्वी विधानसभेत उद्योग विभागाच्या कायद्यासंदर्भातील चर्चे दरम्यान आ. धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्वात आधी परळी एमआयडीसी सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले होते.
त्यानंतर लगेचच आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी एमआयडीसी ची अधिसूचित जमीन महसुली प्रक्रिया पूर्ण करून तातडीने हस्तांतरित करण्याबाबत मुंबईत बैठक संपन्न झाली.
या बैठकीस उद्योग विभागासह एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, बीड च्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे (व्हीसीद्वारे) परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ आदी उपस्थित होते.
परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र, असल्याने तेथील राखेला वीट उद्योगात मोठी मागणी आहे, वीट उद्योगाचे एमआयडीसी मध्ये विविध सुविधा निर्माण करून क्लस्टर केले गेले तर ते राज्यात एक उदाहरण होईल, असे धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी नमूद केले.
याव्यतिरिक्त पाणी, वीज वाहतूक आदी सर्व पूरक सोयी उपलब्ध असल्याने या एमआयडीसी क्षेत्रात नवीन उद्योगांना आकर्षित करणे सोपे जाईल, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परळी एमआयडीसी मधील पूर्वी अधिसूचित सुमारे 18 हेक्टर जमीन व सर्व्हे नंबर 122 मधील प्रस्तावित जमीन या दोन्हीही जमिनी एमआयडीसी कडे हस्तांतरीत करण्याबाबत संबंधितांना आदेश दिले आहेत.