बीड नगरपालिका ही क्षीरसागरांची जहागिरी नाही…ॲड.राहुल मस्के
बीड : एका लोकप्रिय दैनिक वर्तमानपत्राने आपल्या संपादकीय लेखात बीड नगरपालिकेच्या कारभारावरती व कारभाऱ्यावरती ताशेरे ओढले आज बीड नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच घरातील असल्याने यांचे संपूर्ण व्यवहार साटे-लोट्याचे आणि आम्ही सारे भाऊ -भाऊ नगरपालिका वाटून खाऊ असेच दिसून येत आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने नगरपालिकेमध्ये सत्तांतर घडविल्याशिवाय बीडकरांचा विकास होणार नाही. स्वर्गीय मेटे साहेबांचे विचार सत्यात उतरवून आगामी निवडणुकांमध्ये क्षीरसागर विरुद्ध बीडकर असा लढा उभा केल्याशिवाय बीडकरांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत असे स्पष्ट मत शिवसंग्रामचे बीड शहराध्यक्ष ॲड. राहुल मस्के यांनी व्यक्त केले .
बीड नगरपालिका ही क्षीरसागरांची जहागिरी नाही त्यामुळे सर्वसामान्य बीडकर यांनी आपले हक्क व अधिकार मिळवण्यासाठी आता पेटून उठणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने आज स्व.विनायकरावजी मेटे साहेब आपल्यात नाहीत परंतु त्यांचे मजबूत आणि भक्कम विचार तुमच्या- आमच्या मध्ये आहेत आणि स्वर्गीय मेटे साहेबांचे विचारच आपल्याला आपले हक्क आणि अधिकार मिळवून देतील व बीडकरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व सत्तांतर घडवून आणण्यासाठी खऱ्या अर्थाने पुरेसे ठरतील.
मागील 40 वर्षापासून बीड नगरपालिकेवर क्षीरसागरांची निर्विवाद सत्ता असून सुद्धा बीडकरांची मूलभूत प्रश्न मार्गी लागले नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे क्षीरसागरांना सर्वसामान्यचे प्रश्न सोडवायचे नाहीत तथा सुटू द्यायचे नाहीत हे ही तितकेच खरे आहे. बीड नगरपालिकेने कामाचे कंत्राट काढत असताना टक्केवारीसाठी लाळघोटेपणा करायचा आणि आपल्या मर्जीतल्या माणसाला ही कंत्राटे द्यायची आणि त्या व्यक्तीने फक्त महिना भरला की पगार – बिले उचलण्यासाठी नगरपालिकेच्या दारात उभे राहायचे ह्या सर्वांचे पगार व खर्च नागरिकांच्या उत्पन्नातून करायचा एवढे असून सुद्धा कसलीच नागरी सुविधा बीडकरांना द्यायची नाही याचं एक समीकरणच क्षीरसागरांनी तयार करून ठेवले आहे. बीडच्या स्वच्छतेचे कंत्राट असेल, घंटागाडीचे कंत्राट असेल, पाणी सोडण्याचे कंत्राट असेल, शहरातील रस्ते, वीज, तथा भुयारी नाल्या असतील अशा एक नव्हे अनेक प्रश्न आज तसेच आहेत. ना धड रस्ते नीट आहेत. थोडासा पाऊस झाला तर चिखल बीड व गटार बीड होते आणि रस्त्याचे पाणी सर्वसामान्य घरात जातं. ग्रामीण भागातील खेड्यात सुद्धा एवढा चिखल होत नाही तेवढा चिखल बीडच्या रस्त्यावर पावसाळ्यात होतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही हे चित्र आपण दैनिक वर्तमानपत्र आपण सर्वांनी पाहिलेलेच आहे. पंधरा – पंधरा दिवस नळाला पाणी सोडले जात नाही. आज खऱ्या अर्थाने पाली धरण हे तुडुंब भरले असताना व बिंदुसरा नदी खळखळ वाहत असताना तुम्हा -आम्हाला पाण्यासाठी वन – वन व भटकंती करावी लागते हेच बीडकरांचे दुर्दैव आहे. स्वच्छतेचे एवढे कंत्राट दिले असताना फक्त लाखोंची बिले उचलली जातात परंतु कोणत्याच रस्त्या स्वच्छ दिसत नाही. नाल्या गटाराने तुडुंब भरलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी कधीही नाल्या स्वच्छ केले जात नाहीत आणि नालीतील घाण उपसून ही रस्त्यावरच टाकली जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परंतु याच्याशी क्षीरसागरला काही देणं-घेणं वा सोयीसुतक नाही. आज खरच तुम्हा-आम्हाला विचार करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थाने आपण -आपल्या प्रश्नावर ठाम राहिलो तर निश्चितपणे आगामी निवडणुकांमध्ये परिवर्तन घडू शकते. आणि बीड नगरपालिकेला क्षीरसागर नावाची लागलेली कीड कायमस्वरूपी आपल्याला बाजूला काढता येईल. यासाठी विकासाला मत व प्रश्न सोडवतील ते नेतृत्व मान्य करून आपल्याला एक मुखाने सर्वजणांना एक होऊन त्यांच्या विरोधात एक मोठा लढा उभा करावा लागेल आणि नगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणावे लागेल.स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचे विचारच परिवर्तन घडवण्यासाठी पुरेशी आहेत असे स्पष्ट मत शिवसंग्रामचे बीड शहराध्यक्ष ॲड. राहुल मस्के यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.