बीड : पिडीत पवार कुटुंबाचा व या संबंधित व्यक्तींच्या मंजूर घरकुल बांधकामासाठीच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्याच्या अनुषंगाने व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शासकिय योजनेचा लाभ मिळवून देतानाच घरकुल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून जिल्हा प्रशासन कडून तातडीने काम केले जात आहे असे असे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आश्वासित केले.
पिडीत पवार कुटुबाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व शासकिय अधिकारी यांचेसह झालेल्या बैठकप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी वासुदेव सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, शासकिय अधिकारी व विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विविध संघटनांचे सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पिडीत कुटुंबियांच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांसमोर मागण्या व निवेदने मांडली. पिडीत पवार कुटुंबातील त्यांची पत्नी व इतर सदस्य यांनी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन मयत अप्पा पवार मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे वर अंत्यसंस्कारासाठी होकार दिला.
त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने, रोटरी क्लब, जिल्हा परीषद व महसूल कर्मचारी संघटना व श्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शासकिय योजनेचा लाभ मिळवून देतानाच घरकुल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यापूर्वी देखील शासकीय योजने तून घरकुल देणेबाबत सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येत असून प्रशासनाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड, गटविकास अधिकारी पंचायत समिती बीड व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद यांचेकडून तातडीने काम केले जात आहे असे असे जिल्हाधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा यांनी आश्वासित केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसिलदार सुहास हजारे, गटविकास अधिकारी श्री.सानप, विविध विभागांचे अधिेकारी उपस्थित होते.