—32 घंटे होऊन सुद्धा आप्पाराव पवार यांच्यावर अंत्यसंस्कार नाहीत
—पवार कुटूंब व जिल्हा प्रशासनाची बैठक सुरु
—घरकुलाचा प्रश्न मार्गी लावा व संबंधित अधिकार्यांवर गुन्हे नोंद करा — पवार कुटूंब
—जिल्हाधिकारी यांनी विशेष पुढाकार घेण्याची गरज
-लग्न कार्यासाठी नेते जसा वेळ काढतात तशा वेळ सर्वसामान्यांसाठी कधी काढणार?
-घरकुलासाठी मृत्यू झालेल्या कुटंबाला न्याय देण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ नाही
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : घरकुलाच्या प्रलंबित प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या आप्पाराव पवार (वय 53) यांचा रविवारी (ता. चार) दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. परंतू पालकमंत्र्यांना या घटनेचे काहीच देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुतनीचे लग्न बीड शहरात मोठ्या थाटात संपन्न झाले. या शुभकार्यासाठी पालकमंत्री यांनी विशेष उपस्थिती दर्शवली होती. पण घरकुलासाठी ज्या पवार परिवारातील एकाचा मृत्यू झाला त्यांना मात्र भेटण्यासाठी पालकमंत्री वेळ नव्हता. ज्या प्रकारे पदाधिकाऱ्यांच्या शुभकार्यासाठी नेते वेळ काढतात, त्याच प्रकारे सर्व सामान्यांच्या दु:खात वेळ का काढत नाहीत. निवडणूकांच्या दरम्यान ह्याच सर्वसामान्यांच्या घरी जेवण्याचे शोंग फक्त फोटो शुट साठी असते का? जिल्ह्यात सध्या नेते व प्रशासनाचा ताळमेळ नसल्यामुळे यांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.३० घंटे होऊन सुद्धा आप्पाराव पवार यांचा अंत्यविधी झाला नसून दुपार पर्यंत पवार कुटूंब व जिल्हा प्रशासनाची बैठक सुरु होती परंतु यात काही तोडगा दुपार पर्यंत निघाला नव्हता. घरकुलाचा प्रश्न मार्गी लावून संबंधित अधिकार्यांवर गुन्हे नोंद करा या मागणीवर पवार कुटूंब ठाम होते.
बीड जिल्ह्यात आज पर्यंत अनेक नेते घडले, परंतू आज पर्यंत बीड जिल्ह्याचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. बीड जिल्ह्यातील सहा ते सात लाख ऊसतोड बांधव प्रत्येक वर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी पर जिल्ह्यात, पर राज्यात जाऊन उसतोडणीचे काम करतात. यासह जिल्ह्यातील युवक वर्ग सुद्धा आता कामाच्या शोधात मोठ्या शहरात जाऊन काम करत आहे. बीड जिल्ह्यात विविध समस्या सर्वसामान्यांना भेडसावत असतात, परंतू याकडे मात्र सत्ताधारी नेते दुर्लक्ष करताना दिसतात. बीड तालुक्यातील पवार कुटूंब घरकुलासाठी गेल्या चार वर्षापासून प्रशासनाच्या दारात चक्करा मारत आहेत. परंतू त्यांचा प्रलंबित प्रश्न आज पर्यंत मार्गी लागलेला नाही. रविवारी या कुटूंबातील प्रमुख आप्पाराव पवार यांचे उपोषणा दरम्यान निधन झाले. निधन झाले सकाळी आठ वाजता व प्रशासन आले साडे दहा वाजता, म्हणजे सर्व सामान्यांच्या जीवाची परवा कोणालाच राहीली नसल्याचे कालच्या प्रकरणावरुन दिसून आले. पालकमंत्री सत्तेत असून सुद्धा म्हणावे असे लक्ष जिल्ह्यात देताना दिसत नाहीत. रविवारी (ता. चार) भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पुतनीचा विवाह सोहळा शहरात मोठ्या थाटात संपन्न झाला या विवाह सोहळ्यास पालकमंत्री अतुल सावे यांनी विशेष वेळ काढून उपस्थित राहील्या होत्या. पदाधिकाऱ्यांच्या शुभकार्यास उपस्थित राहीलेही पाहीजे पण ज्या मतदारांनी आपल्याला निवडूण दिले त्यांच्या दु;खात सुद्धा उपस्थित राहून त्यांच्या समस्यांची विचारपुस करण्याची गरज असते. परंतू पालकमंत्री यांना त्यांच्या कामाचा विसर पडल्याचे त्यांच्या कामकाजावरुन दिसून येत आहे. ३० ते ३५ तास होऊन सुद्धा आप्पावर पवार यांच्याशर अंत्यसंस्कार झाले नव्हते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांच्यासह इतर पदाधिकारी यांच्यासोबत पवार कुटूंबाची बैठक दुपार पर्यंत सुरु होती. यावेळी अनेक समाजिक संघटना उपस्थित होत्या. पवार कुटूंबाने घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा व संबंधित अधिकार्यांवर गुन्हे नोंद कराव्येत अशी मागणी यावेळी पवार कुटूंबाने केली. परंतु दुपार पर्यंत यात काही तोडगा निघाला नव्हता.
खासदारांनी पवार कुटूंबाची घेतली भेट
खासदार प्रितम मुंडे यांनी रविवारी राञी पवार कुटूंबाची भेट घेऊन पवार कुटूंबाला आधार दिला. यासह ताईंनी यात विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे.