गेवराई, प्रतिनिधी ः- जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील रेवकी जिल्हा परिषद गटात मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. माजी जि.प.सभापती बाळासाहेब मस्के यांच्या पुढाकारातून बी.एम. प्रतिष्ठान आणि एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीरात अकरा दिवसांत सुमारे ३३०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. १४ डिसेंबर पासून प्रत्येकी ३० रुग्ण गटाप्रमाणे ४३८ रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई विधानसभा मतदार संघात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब मस्के यांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. मंगळवार, दि.२२ नोव्हेंबर रोजी नेत्र तपासणीला सुरुवात करून शुक्रवार, दि.२ डिसेंबर पर्यंत सुमारे अकरा दिवसांत रेवकी जि.प.गटातील २२ गावांतील ३३०० रुग्णांची प्रत्यक्ष तपासणी या शिबीरात करण्यात आली. शिबीराला ग्रामीण नागरीकांनी मोठा प्रतिसाद दिला. बी.एम.प्रतिष्ठान आणि एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले.
नेत्रतपासणी नंतर शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ४६८ रुग्णांवर एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटल, पुणे येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दि.१४ डिसेंबर पासून प्रत्येकी ३० रुग्णांचा एक गट करून पुणे येथे या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. गेवराई येथन पुणे येथे शस्त्रक्रियेसाठी येणे-जाणे व भोजनाची मोफत व्यवस्था आयोजकाच्यावतीने करण्यात आली आहे. शिबीरासाठी गेवराई येथील डॉक्टरांनी अमुल्य सहकार्य केल्याचे बाळासाहेब मस्के यांनी सांगितले. विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या शिबीराच्या यशस्वीतेसाठी या भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.