औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन आता सिल्लोडपर्यंत पोहचले आहे. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बोलताना सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळले असून त्यांनी बदनामी करण्यासाठी कट रचला जातोय, असा आरोप केला आहे.
परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमध्ये तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे.
हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून 2020 मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली आहे, त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे.
याप्रकरणी बोलताना सत्तार यांनी बदनामी करण्यासाठी कट रचला जातोय, असा आरोप केला आहे. मुलींची चुक असेल तर बिनधास्त कारवाई करा. बदनामी करणाऱ्यांना फासावर लटकवा. या प्रकरणाची नीट चौकशी करा, अशी मागणी करत सत्तार यांनी बदनाम करण्याचे काम कुणीही करु नये. सर्वांनी आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यावी. याची सर्व विचारपूस करण्यासाठी शिक्षण अधिकारी आहेत. त्यांच्याकडे यासंदर्भात तक्रार गेली असेल. जर त्यामध्ये नावं आढळल्याने आम्ही जबाबदार आहोत. पण चुकीची माहिती देऊन बदनामी करण्यात येत असेल तर त्यांच्यावर धडक कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया देत सत्तार यांनी मुलींवर झालेले आरोप नाकारले आहेत.