धनंजय मुंडेंनी आज वाचनालयाच्या कामाची पाहणी करत तातडीने काम पूर्ण करण्याच्या केल्या सूचना
परळी – परळीत शहरात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व नगर परिषदेच्या माध्यमातून सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चून डॉ. भालचंद्र यांच्या नावाने भव्य वाचनालय साकारले जात असून आज या वाचनालयाच्या बांधकामाची धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
या वाचनालयाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात असून त्यापाठोपाठ फर्निचर व अन्य पूरक सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या सर्व कामांचा एकूण अंदाजित खर्च सुमारे साडेचार कोटी रुपये असून, हे काम तातडीने पूर्ण केले जावे, अशी सूचना धनंजय मुंडे यांनी नगर परिषद प्रशासनाला केली आहे.
वाचन, शिक्षण व सांस्कृतिक प्रगतीमध्ये परळी शहराचा विकास व्हावा, यादृष्टीने नगर परिषदेच्या माध्यमातून भालचंद्र वाचनालयाच्या निर्मितीसाठी धनंजय मुंडे यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार या भव्य वाचनालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, या वाचनालयात कार्यालयासह भव्य ग्रंथालय, स्टडी रूम, रिडींग रूम, स्वच्छतागृह, वाहन पार्किंग व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
धनंजय मुंडे यांनी आज या संपूर्ण इमारतीची पाहणी करत उत्तम दर्जा सांभाळून तातडीने या वाचनालयाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या, यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, राजा खान, अय्युबभाई पठाण, नगर परिषद मुख्याधिकारी सुंदर बोंदर, महेंद्र रोडे, जालिंदर नाईकवाडे, वैजनाथ बागवाले, मुन्ना बागवाले, केशव गायकवाड, अनंत इंगळे यांसह आदी उपस्थित होते.