नगद नारायण गडाचे घेतले दर्शन, गडाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत
बीड : धाकटी पंढरी श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथे आजवर मी आलो नाही, याची खंत वाटते. माझ्या खासदारकीच्या काळात आलो असतो तर मागेल ते दिले असते. परंतु आज खासदार नसलो तरी गडाच्या विकासासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. असे आश्वासन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. ते नगद नारायण गड येथे सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
छत्रपती संभाजी महाराज हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. सोमवारी (दि.२७) सकाळी त्यांनी श्री.क्षेत्र नारायणगडावर जाऊन नगद नारायणाचे दर्शन घेतले. यावेळी गडाच्यावतीने विश्वस्तांनी संभाजी महाराज व महंत शिवाजी महाराज यांचा सामूहिक सत्कार केला. यावेळी पुढे बोलताना छत्रपती संभाजी महाराज म्हणाले,महंत शिवाजी महाराज यांच्या नेतृतवाखालील श्री क्षेत्र नारायण गड काम करत असल्याचा आनंद आहे. मात्र एवढे दिवस मी गडावर आलो नाही, याची खंत वाटते. कोल्हापूर कुठे, पश्चिम महाराष्ट्र कुठे पण असे ठिकाण नाही. भक्ती आणि शक्तिचा संगम झाल्यानंतर एक विचार तयार होतो. ३५० वर्षापूर्वी वारीला संरक्षण देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. ती परंपरा आजही पुढे सुरू आहे. मी पण आनंदाने वारीमध्ये सहभागी होत असतो.गडाच्या विकासासाठी मी मदत करेल. खासदार नसलो तरी वेगवेगळ्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करेल. असे जुनी प्राचीन मंदिर पश्चिम महाराष्ट्र येथे नाहीत. नारायण गडाच्या वैभवात भर घालण्यासाठी काम करूया, गडावरील पुरातन गोष्टींचे संवंर्धन कसे करावे, यासाठी माझ्याकडे एक तज्ञ टिम आहे. ती टिम गडावर येऊन पाहणी करेल. रायगड येथे हीच टीम काम करत आहे, असेही छत्रपती संभाजी महाराज म्हणाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी श्री.क्षेत्र.नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज, गडाचे विश्वस्त अनिल जगताप,दिलीप गोरे,बळीराम गवते, बी.बी.जाधव, ॲड.महादेव तुपे, गोवर्धन काशीद, कारागृह अधीक्षक विलास भोईटे, कारागृह निरीक्षक महादेव पवार, धनंजय जाधव, अप्पासाहेब कुडेकर, सचिन मोटे, ऋषिकेश बेदरे, राहुल दुबाले, रवी शिंदे, विजय लाटे, अशोक सुखवसे, नाना पवार, अशोक जोगदंड, गोविंद गवते आदींसह छत्रपती संभाजी महाराज यांच्या समर्थकांची उपस्थिती होती.
छत्रपतींच्या हस्ते केले वृक्षरोपन
श्री.क्षेत्र नगद नारायण गड येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्याहस्ते वृक्षारोपन करावे, अशी संकल्पना विश्वस्त बळीराम गवते यांनी मांडली होती. त्यानूसार छत्रपतींच्या हस्ते महंत शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याहस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी छत्रपतीप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
भक्ती-शक्तीचे दर्शन
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज आणि वारकरी सांप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेवून चालणारे गडाचे महंत शिवाजी महाराज यांना विश्वस्तांच्या वतीने एकत्रीत पुष्पहार घालण्यात आला. यावेळी उपस्थितांना भक्तीशक्तीचे दर्शन झाले.